Sunday, 27 August 2023

फ्रँकफर्ट मधील अभ्यासभेटीचा लोकप्रतिनिधींना उपयोग

 फ्रँकफर्ट मधील अभ्यासभेटीचा लोकप्रतिनिधींना उपयोग


                                                               – डॉ.नीलम गोऱ्हे


 


        मुंबई दि.25 : भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध असून फ्रँकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाच्या माध्यमातून हे मैत्रीसंबंध आणखी दृढ होत आहेत. जर्मनीने आधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम नेतृत्व या आधारे गाठलेला सर्व क्षेत्रातील प्रगतीचा टप्पा निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. भारताचे फ्रँकफर्ट येथील महावाणिज्यदूत श्री.अमित तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यासभेटीमुळे उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषीउत्पादनप्रक्रिया व शाश्वत विकास उद्दिष्ट्ये यासंदर्भातील माहितीची आदान-प्रदान शक्य झाले. त्याचा अभ्यासभेटीवर असलेल्या लोकप्रतिनिधींना निश्चितच उपयोग होईल. या विषयांवर भारतीय प्रशांत विभागातील भारत व जर्मनी यांच्यामधील करारांबाबत पाठपुरावा आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. आज दिनांक 25 पासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या 22 सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यासदौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व डॉ.नीलम गोऱ्हे करित आहेत. आजच्या फ्रँकफर्ट येथील अभ्यासभेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. महावाणिज्यदूत श्री.अमित तेलंग यांनी प्रारंभी सर्व शिष्टमंडळ सदस्यांचे स्वागत केले. या प्रसंगी उप सभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते त्यांचा तसेच अन्य मान्यवरांचा गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या अभ्यासभेटीतील चर्चेत माजी मंत्री श्रीमती विद्या ठाकूर, श्री.माणिकराव कोकाटे, श्री.अमित झनक, श्री.अभिजीत वंजारी, श्रीमती मनिषा चौधरी यांसह अनेक मा.सदस्यांनी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय मराठी मंडळाचे पदाधिकारी श्रीमती शिल्पा मडगडे, श्रीमती प्रिती सोनईकर, श्रीमती भावना जोशी, डॉ.श्रुती कुलकर्णी श्री.ऋषीकेश कुलकर्णी, श्री.समीर मेस्त्री यांनी देखील आपले अनुभव यावेळी सांगितले.


                                                                     000000       



 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi