Friday, 21 April 2023

मराठी विषय वगळण्यात आलेला नाही;यावर्षीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत गुणांकनाची सवलत.

 मराठी विषय वगळण्यात आलेला नाही;यावर्षीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत गुणांकनाची सवलत.

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, ता. २० : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मराठी भाषा सक्ती ही इयत्ता सहावी पासून करण्यात आली आहे. तथापि कोरानाचा काळ असल्याने यावर्षी आठवीत शिकत असलेले विद्यार्थी मराठी भाषा विषय पहिल्यांदाच शिकत आहेत. त्यामुळे 2022-23 च्या आठवीच्या विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षी दहावी पर्यंत एक वेळची बाब म्हणून मराठी विषयाच्या परीक्षेचे श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


उद्यापासून सुटी जाहीर


            यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्ष 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होतील. तथापि सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. तथापि यासाठी नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊ नये. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा न देता सुटीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही श्री.केसरकर यांनी स्पष्ट केले.


000



 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi