Thursday, 5 August 2021

 [05/08, 17:53] Baby: *🌺लाखातील एक सुन🌺* 


रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू  लागला.

        "मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे. प्रतिक आणि प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे मग काय आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं. 

       अनायसे रविवारच आहे उद्या धम्माल करूया सगळे मिळून. आणि हो, प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी काही तरी अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून. खाऊन खाऊन त्याच्या पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे, असं  म्हणून अमित खळखळून हसला. 

      त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो. 

      मैत्रीची जादूच खरं आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना ?

      बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाची छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता. 

        हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता. 

       घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा, म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत. 

       मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलदोडा व सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट, स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता.  

        गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता. 

      सगळेच जण हसण्या - बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला, "नाना अहो हे काय, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही. जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा पाहू."   

      भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले, तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. "असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर. काही काळजी करू नका." असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली.  

      थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले, तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला, "वा ! मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत गं. 

       खरंच खूप छान वाटतंय आज मला. फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा, अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू. काही उमजत नाही गं आताशा त्यांना. उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग."

     अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. "हो रे, अगदी बरोबर आहे तुझं. कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायचं ? पडलेलं राहू देत जावूया एकटंच त्यांना त्यांच्या रूम मध्ये, नाही का ?

       मला एक सांग अमित, तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ? तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील, मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?

        लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल.  जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला.

      वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं. तू दिलेला शी - सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला, तुला फ्रिडम दिलं,  उच्च शिक्षण, उत्तम करियर, परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?... असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझंही जरा स ऐकून घे.  

       मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना. नविन नविन खूप रडायला यायचं. आईची आठवण त्रस्त करायची.

        तू कामात बिझी असायचा, अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच. कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना.

       आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले. अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं ? 

       हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही. उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. 

       पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं, जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते. मग अश्या वेळी  काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?    

        अमितचे डोळे भरून आले. तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला, "मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का ? पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर."

       "अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची ? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने, 

       आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते अमित."

      अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याचं चुकलंच होतं. नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला.

       नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. "अरे अमित तू ? ये बाळा, झोपला नाहिस का अजून ? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही हं येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी."

       नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला. 

       "नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो. उलट यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी."

      लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले. 

       केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि.. चिमुकले घरही मग आनंदाने हसले….


लेखक-अनामिक.

[05/08, 17:53] Baby: असावे घरटे आपुले छान

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi