Friday, 7 August 2026

ब्रिक्स फिल्म बाजारातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल

 ब्रिक्स फिल्म बाजारातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल

-         सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

            मुंबई, दि. ६ : भारताच्या २०२६ च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेला पहिला ब्रिक्स फिल्म बाजार हा चित्रपट, तंत्रज्ञान आणि सर्जनशील उद्योगांसाठी जागतिक स्तरावरील महत्त्वाचा मंच ठरणार आहे, त्यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

            हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित ब्रिक्स सर्जनशील अर्थव्यवस्था (Creative Economy) – WAVES बाजार कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (MER-III) राजीव बोडवडे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सेंथिल राजन, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) संचालक आशुतोष गोवारीकर; तसेच विविध ब्रिक्स देशांतील चित्रपट निर्माते, स्टुडिओ प्रमुख, तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

            मंत्री शेलार म्हणाले की, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात पहिल्या ब्रिक्स फिल्म बाजाराचे यजमानपद महाराष्ट्राला लाभणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) संयुक्तपणे साकारलेला हा दूरदर्शी उपक्रम जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य घडविणारा महत्त्वपूर्ण मंच ठरेल.

            मुंबई ही केवळ स्वप्नांची नगरी नसून जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनत असल्याचे सांगून, ते म्हणाले की, सीमापार चित्रपट सह-निर्मिती, ओटीटी, डिजिटल माध्यमे, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहेत. या फिल्म बाजारामुळे सीमापार वितरण, सर्जनशील सहकार्य आणि दीर्घकालीन संस्थात्मक भागीदारीला चालना मिळेल.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 'वंदे मातरम्'मधून स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना अभिवादन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 9 ऑगस्ट रोजी मुंबईत देशभक्तीपर नृत्य

 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 'वंदे मातरम्'मधून स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना अभिवादन

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 9 ऑगस्ट रोजी मुंबईत देशभक्तीपर नृत्य

-संगीतमय कलाकृतीचे आयोजन

 

मुंबई, दि. ६ :  सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 'वंदे मातरम्' या देशभक्तीपर नृत्य-संगीतमय कलाकृतीचे आयोजन रविवार,
९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भारतीय विद्या भवन
, गिरगाव चौपाटीजवळ, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून, राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या 'चले जाव' आंदोलनाच्या हाकेमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा मिळाली. ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीयांच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, शौर्य, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा ऐतिहासिक दिवस आहे. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

'वंदे मातरम्' या नृत्य-संगीतमय कलाकृतीतून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे अतुलनीय योगदान, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहे. संगीत, नृत्य आणि नाट्यात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 

देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, राष्ट्रनायकांचे कार्य आणि भारतीय संविधानातील राष्ट्रीय मूल्यांची जपणूक नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सदर कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि राष्ट्रभावनेचा जागर करण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने करण्यात येत आहे.

 

मुंबई व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, युवक, सांस्कृतिकप्रेमी आणि रसिकांनी या प्रेरणादायी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' विषयावर 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' विषयावर

'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात

प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' या लोकप्रिय कार्यक्रमांतून राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' या योजनेविषयी सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से.) यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

 

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात या विशेष मुलाखतीच्या पहिल्या भागाचे प्रसारण मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर होणार असून, त्यानंतर ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 'दिलखुलास' कार्यक्रमातून या मुलाखतीचे प्रसारण १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच 'News On AIR' या मोबाईल ॲपवर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

MH01FL दुचाकी मालिकेला १० ऑगस्टपासून प्रारंभ; पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 MH01FL दुचाकी मालिकेला १० ऑगस्टपासून प्रारंभ;

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ६ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी खासगी संवर्गातील वाहनांसाठी MH01FK ही नोंदणी मालिका संपुष्टात येत असून, त्याऐवजी MH01FL ही नवीन नियमित मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करून घेण्यासाठी वाहनधारकांनी सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील सुधारित नियम ५४(अ) नुसार विहित शुल्क भरून आकर्षक अथवा पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक शुल्काचा धनादेश "प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य)" / "Regional Transport Office, Mumbai (Central)" यांच्या नावे सादर करावा लागतो. आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता १८० दिवसांची असून, या कालावधीत संबंधित वाहनाची नोंदणी करणे आवश्यक आहे. आरक्षित क्रमांकाची पावती वाहनाच्या डेटा एन्ट्रीवेळी वाहन-०४प्रणालीमध्ये नोंदविल्यानंतर संबंधित वाहनाला तो क्रमांक मंजूर केला जातो.

 

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जाचे नमुने कार्यालयातील खिडकी क्रमांक ई-11 येथे उपलब्ध असून, मार्गदर्शनासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

MH01FL या नवीन मालिकेतील पसंतीचा वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी अर्ज आणि विहित शुल्क १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत खिडकी क्रमांक ई-11 येथे श्री. ऑल्विन पॉल यांच्याकडे सादर करता येईल. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्याच दिवशी दुपारी २ वाजता लिलाव पद्धतीने संबंधित नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) अनिल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बुलढाण्यातील माईस प्रकल्प आणि सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी उभारणीला गती देणार

 बुलढाण्यातील माईस प्रकल्प आणि सिंदखेड राजा येथील

जिजाऊ सृष्टी उभारणीला गती देणार

मंत्री शंभूराज देसाई

 

 मुंबई, दि. ६: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील हातणी व वळती येथील माईस  प्रकल्पाबरोबरच सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या ऐतिहासिक महत्वाला साजेशी 'जिजाऊ सृष्टी' उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करेल. या दोन्ही प्रकल्पांमुळे विदर्भातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

 

मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मौजे हातणी व वळती येथील प्रस्तावित माईस  (मीटिंग्ज, इन्सेटिव्ह, कॉन्फरन्स अँड एक्झीबिशन) प्रकल्प तसेच शिवसृष्टी उभारणी आणि सिंदखेड राजा येथील प्रस्तावित जिजाऊ सृष्टीसंदर्भात आढावा बैठक पार पडली.

खनिज व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली विकसित करणार

 खनिज व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली विकसित करणार

-मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई, दि. ६ : राज्यातील खनिज व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नवतंत्रज्ञानावर आधारित करण्यासाठी आधुनिक डिजिटल 'मिनरल मॅनेजमेंट सिस्टीम' विकसित करण्यात येत असून, या प्रणालीच्या माध्यमातून महसूलवाढीसह खनिज संपत्तीचे शाश्वत आणि परिणामकारक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात येईल, असे प्रतिपादन खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

            मंत्रालय येथे खनिकर्म विभागासाठी विकसित करण्यात येणाऱ्या आधुनिक डिजिटल 'मिनरल मॅनेजमेंट सिस्टीम' संदर्भातील सविस्तर सादरीकरणाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत डोके, दूरदृश्य प्रणालीद्वारे भूविज्ञान व खाणकाम विभागाचे महासंचालक डॉ. टी. आर. के. राव तसेच विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीत राज्यातील खनिज व्यवस्थापन अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या डिजिटल प्रणालीच्या विविध घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खनिकर्म विभागाचा महसूल वाढविण्यासाठी या प्रणालीचा प्रभावी वापर, त्यामध्ये आवश्यक सुधारणा, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध विभागांमधील समन्वय तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामकाज अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

            राज्यातील खनिज संपत्तीचे शाश्वत, पारदर्शक आणि परिणामकारक व्यवस्थापन हे शासनाचे प्राधान्य असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच, 'मिनरल मॅनेजमेंट सिस्टीम'च्या अंमलबजावणीसंदर्भातील अंतिम निर्णय खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर तसेच भूविज्ञान व खाणकाम विभागाशी सविस्तर चर्चा करून घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली

विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल; अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल;

अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

 

मुंबई, दि. ६ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.

 

सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत घरोघर भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण व पुनर्रचना १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात येईल.

 

मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल.

 

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोग मार्फत कळविण्यात आले आहे.

0000


Featured post

Lakshvedhi