. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
· प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व आत्मचरित्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि . २९ :- वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावताना हजारो रुग्णांचे प्राण वाचविणारे, हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि वैद्यकीय संशोधनाला नवी दिशा देणारे डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त आहे. महिला आरोग्य आणि प्रसूतीशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी केलेले विशेष कार्य, संशोधन आणि अध्यापन यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळा आणि त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा अभिमानाचा क्षण असल्याचे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले.
महिलांच्या आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणारे प्रा. डॉ. सी. एन. पुरंदरे यांचा कार्य गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, डॉ. पुरंदरे हे केवळ उत्कृष्ट चिकित्सक नसून शिक्षक आणि संशोधक म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे १४० हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. आत्मचरित्र म्हणजे केवळ कामांची यादी नसून एका काळाचा इतिहास असतो. ज्ञान, संशोधन आणि कौशल्यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश देणारा डॉ. पुरंदरे यांचा जीवनप्रवास तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मंत्री भुजबळ म्हणाले.
प्रा. डॉ. पुरंदरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेले कार्य हे केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून, महिला आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारे असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सेवाभावी वृत्तीचा लाभ असंख्य रुग्णांना झाला असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले डॉ. पुरंदरे यांनी त्यांच्या कामातून जगभरात ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या जीवनाचे विविध पैलू समोर येतील असे सांगत त्यांनी पुरंदरे कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.