Saturday, 29 August 2026

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर -

 अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

मुंबई,दि.२७: जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले की, "शेतकऱ्यांना मिळणारा हा मदतीचा निधी त्यांच्या कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करून घेतला जाऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण विभागातील तब्बल १७,२४५ बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांना 'डीबीटी'  प्रणालीद्वारे मदत दिली जाणार आहे.

विभागावार मदतीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. राज्यभरातील एकूण ११,२०७.७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी १७ हजार २४५ शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रूपयांची ही मदत मंजूर करण्यात आली आहे. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यातील  ९६८३ बाधित शेतकऱ्यांना (१३ कोटी ८० लाख रुपये), पुणे विभागात पुणे व सातारा या जिल्हयांचा समावेश असून  ६,८८५ बाधित शेतकरी यांच्यासाठी ९ कोटी १३ लाख रूपये मंजूर,नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे ६६१ बाधित शेतकरी यांच्यासाठी (३८ लाख ८७ हजार रुपये) कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्हयातील १६ बाधित शेतक-यांसाठी (४१ हजार रुपये) मंजूर करण्यात आले आहेत.

मदतीचे वाटप करताना कोणत्याही प्रकारची द्विरुक्ती (एकाच व्यक्तीला दोनदा लाभ) होणार नाही याची खबरदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. तसेच मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, असे निर्देशही शासनाने जारी केले आहेत.

                                                        

Friday, 28 August 2026

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष · सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा

 न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष

·        सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा

 

पुणे दि.२८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा (JMFC CJJD) पूर्व प्रशिक्षण योजनेच्या पात्रतेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) क्र. १११०/२०२५ च्या संदर्भात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (CJJD) परीक्षेसाठी आवश्यक असलेला वकिलीचा अनुभव (Law Practice) तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विधी/न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी असलेली तीन वर्षांच्या वकिली अनुभवाची अट बदलून एक वर्ष करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणाच्या अनुषंगाने वर्ष २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ करिता ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या संस्थांच्या लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी सुधारित पात्रता निकषाची नोंद घेऊन त्यानुसार ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन निलेश सागर (भा.प्र.से.), अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अंमलबजावणी व समन्वय समिती तथा आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (आसंप्रसं), पुणे यांनी केले आहे.

00000

काठमांडू व सागा (चीन ) येथे अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू रायगड, अहिल्यानगर, नागपूर जिल्ह्यातील नागरिक परत येण्यासाठी सुरक्षितरित्या मार्गस्थhttps://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

  

काठमांडू व सागा (चीन ) येथे अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

रायगड, अहिल्यानगर, नागपूर जिल्ह्यातील नागरिक परत येण्यासाठी सुरक्षितरित्या मार्गस्थ

मुंबई, दि.28: नेपाळमधील काठमांडू व चीनमधील सागा (चीन ) येथे पर्यटन साठी गेलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यादृष्टीने केंद्र सरकार, नेपाळ व चीन सरकारच्या माध्यमातून कार्यवाही करत असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार रायगड, अहिल्यानगर, नागपूर यासह अनेक ठिकाणचे नागरिक सुरक्षितरित्या परत येत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सचे  टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी 45 जणांच्या ग्रुपमध्ये अहिल्यानगर (27) नाशिक(12), पुणे(5), मुंबई (1) जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. हा ग्रुप नेपाळ येथील चितवन येथे आहे. सर्वजण सुखरूप आहे. सदर ग्रुप नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचणार आहे. लुंबिनी येथे मुक्काम करून उद्या आयोध्याकडे निघणार असल्याचे श्री गुंजाळ यांनी कळविले आहे.

ट्रॅव्हल्सच्या निर्मलाताई गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप नेपाळमध्ये आहे. सर्व नागरिक सुखरूप आहेत.सद्यस्थितीत काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्यामुळे ते लुंबिनीकडे जाणार असून तेथून पुढे आयोध्याकडे जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. सद्यस्थितीत त्यांना असून त्यांनी शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहे.

 

रायगड जिल्ह्यतील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने 37 व्यक्ती नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेल्या आहेत. सध्या सर्व जण सागा (चीन ) येथे सुरक्षित आहेत. त्यांचे काठमांडू येथून 29 रोजी भारतात परतण्यासाठी विमान आहे. सर्व जण पर्यायी मार्गने काठमांडूकड़े आज सकाळी रवाना झाले असून सायंकाळ पर्यंत काठमांडू एअरपोर्टला पोहचतील. ते उद्या येतील, अशी माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे. सर्वांची तब्येत ठीक असून त्यांच्यापैकी दोघे डॉक्टर आहेत.

 

नागपूर जिल्ह्यातील सर्व १०६ नागरिक सुखरूप असून,नागपूर जिल्हा प्रशासन यांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाबाबत आवश्यक समन्वय व देखरेख करण्यात येत आहे.त्यापैकी ४ नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले असून, उर्वरित १०२ नागरिक बसमार्गे भारतात दाखल झाले आहेत.१०२ नागरिक बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात असून, आज रात्री ते पटना येथे पोहोचून तेथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या रेल्वेने पटना येथून नागपूरकडे रवाना होणार आहेत.

 

वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती नेपाळ मध्ये अडकलेल्या असल्याबाबतची माहिती अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नाही.

 

 नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून  त्यांना मदतीसाठी आवश्यक असल्याने प्रयत्न केले जात आहेत.

 

नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर, नेपाळ येथे  अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

 

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात  आला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून मदतीसाठी 1070  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

 गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी;

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

                                                                - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होण गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

            गणेशोत्सव-2026 निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार राज्यभर पुढे नेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा जपताना शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकासह प्रशासन, मंडळे आणि विविध संघटनांवर असल्याचे ते म्हणाले.

            महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

            विविध महानगरपालिका क्षेत्रांतील गणेशमूर्तींच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवावेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत आणि रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध असेल, याची विशेष काळजी घ्यावी.            बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम, 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांसाठी मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. त्यासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना ‘तो राजहंस एक...’ सांगितिक कार्यक्रमातून हृद्य मानवंदना · सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2 सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

 ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना

तो राजहंस एक... सांगितिक कार्यक्रमातून हृद्य मानवंदना

·         सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2 सप्टेंबर रोजी

विलेपार्ले येथे विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या स्मतीदिनानीमित्त त्यांच्या संगीतसाधनेला आणि मराठी संगीतविश्वातील अमूल्य योगदानाला अभिवादन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने तो राजहंस एक...या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार,  2 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी मराठी भावसंगीताला स्वतंत्र ओळख आणि समृद्ध आशय प्राप्त करून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतांमधून भाव, शब्द आणि सुरांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या संगीतसंपदेला मानवंदना देणारा हा विशेष कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

या सांगीतिक कार्यक्रमात अजित परब, धनश्री देशपांडे, मुक्ता जोशी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी हे गायक कलाकार आपल्या सुमधुर गायनातून श्रीनिवास खळे यांच्या संगीतविश्वाचा अनुभव रसिकांना देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक करणार असून, ज्येष्ठ व्हायोलीन वादक महेश खानोलकर हे संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

कार्यक्रमात विजू तांबे, प्रशांत लळीत, सागर साठे, अभिजीत सावंत, प्रभाकर मोसमकर आणि दत्ता तावडे हे वादक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना पुष्कर सुधाकर श्रोत्री यांची आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेतील मान्यवर कलाकारांच्या योगदानाचे स्मरण आणि त्यांच्या कलाकृतींचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

तो राजहंस एक...या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, विनामूल्य प्रवेशिका मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबईतील रसिकांनी या विशेष सांगीतिक मानवंदना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

कृषी क्षेत्रात वेगाने बदल होत असून हवामान बदलामुळे येणाऱ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे

 कृषी क्षेत्रात वेगाने बदल होत असून हवामान बदलामुळे येणाऱ्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान देऊन सक्षम करावे. कृषी क्षेत्र आणि संबधित क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणारा विद्यार्थी, कृषी क्षेत्रातला शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ महाविद्यालयाने घडवावा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते 'मविप्र पत्रिका'च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

नाशिकच्या कृषी प्रगतीचा विशेष उल्लेख करतांना

 नाशिकच्या कृषी प्रगतीचा विशेष उल्लेख करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. येथील शेतकरी अत्यंत मेहनती आहेत. आदिवासी भागातही विविध वनोपज तयार केली जाते. देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या 80 टक्के निर्यात नाशिक जिल्ह्यातून होते. नाशिक जिल्ह्यातला कांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

शेती फायदेशीर करायची असेल तर शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होणे अत्यंत महत्वाचे आहे. देशातील अनेक राज्य कृषी उत्पादकतेत मागे पडली आहेत. रासायनिक खतांच्या अतिउपयोगामुळे मातीची क्षमता कमी झाली आहे. म्हणून राज्य शासन कमी खतांच्या वापरात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi