3156
गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करा
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई, दि. १९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी रस्त्यांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची सद्यस्थिती, देखभाल-दुरुस्ती आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामांचा मंत्रालयात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. मंत्रालयातील या बैठकीला मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत सहभागी झाले.