Wednesday, 27 May 2026

राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून 'टीबीमुक्‍त मुंबई' अभियान

 राज्यपालांच्या पुढाकाराने मंगळवारपासून 'टीबीमुक्‍त मुंबई' अभियान

 

·         महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत मंगळवारी धारावी व सायन येथे अभियानाचा शुभारंभ

·         राज्‍यपालांच्‍या हस्‍ते क्षयरुग्‍णांना पोषण आहार किटचे वाटप केले जाणार

 

मुंबई, दि. 25: महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून 'टीबी मुक्त मुंबई' अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे होणार आहे.

 

मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्‍य केंद्र येथे तसेच ११.३० वाजता सायन येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालय येथे अभियानाची सुरुवात करण्‍यात येणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्‍ते क्षयरूग्‍णांना पोषण आहार किटचे वाटप देखील करण्‍यात येणार आहे.

000000


बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार

 बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण

जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

       

मुंबई, दि. २५ : मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यानउभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू  तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत.

या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.

यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे  विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

00000

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा

हरियाणा 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

 

            मुंबई, दि. 27: महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलावैभव राष्ट्रीयस्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने लोकायन लोकोत्सव या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे हरियाणातील गुरुग्राम येथे 4 व 5 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आणि लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, मुंबई यांच्या सहयोगाने हा दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे. गुरुग्राम येथील एसजीटी युनिव्हर्सिटी 45 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. या लोकोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध पारंपरिक; तसेच प्रयोगात्म लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोककला जतन व संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित लोककलावंत यात सहभागी होऊन पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत, पोवाडे, भारूड, गोंधळ, लावणी, दिंडी, लोकनाट्य, आदिवासी लोककला; तसेच आधुनिक प्रयोगशील लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा, लोकसंवेदना आणि सामाजिक आशय या कलाविष्कारांतून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.

लोकायन लोकोत्सवहा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा एक वैचारिक आणि कलात्मक उपक्रम ठरणार आहे. विविध कलाप्रकारांमधून भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता, सामाजिक समरसता आणि लोककलांचे जतन या मूल्यांचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लोककला राष्ट्रीयस्तरावर सादर करून कलावंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला लोकपरंपरांशी जोडणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट करणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. गुरुग्राम येथील रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव या निमित्ताने घेता येणार आहे.या सांस्कृतिक महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयावर

 मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील हजारो रुग्णांसाठी डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय हे महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र मानले जाते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरची उपलब्धता ही सार्वजनिक आरोग्यसेवेला मोठा आधार ठरणार आहे.

            या उपक्रमामुळे प्रयोगशाळेतील कार्यपद्धती अधिक कार्यक्षम होणार असून अहवालांचा टर्नअराउंड टाइमलक्षणीयरीत्या कमी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नमुन्यांचे विश्लेषण अधिक अचूकपणे करता येणार असल्याने उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.

            इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य संस्थांची क्षमता वाढत असून, नागरिकांना अधिक सक्षम व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितले आहे की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची जोड मिळत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक सेवा देण्यास मदत होईल.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून, हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मोठ्याप्रमाणात रक्त तपासण्या अधिक वेगाने आणि अचूकपणे करता येणार आहेत. नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल चाचण्या कमी वेळेत पूर्ण होणार असल्याने डॉक्टरांना त्वरित वैद्यकीय निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, रुग्णांना उपचार लवकर सुरू करण्यास मदत मिळणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणार आहे

‘इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर

 वृत्त 1901

इंडियन ऑईलच्या सीएसआर उपक्रमातून

कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर

-          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि. 27 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कर्तृत्ववान व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार

 कर्तृत्ववान व्यक्तींची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार

- मंत्री जयकुमार रावल

·         पद्म पुरस्कार २०२७ साठी राज्यस्तरीय शिफारस समितीची आढावा बैठक

 

मुंबई, दि. २६ : राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय गौरव मिळवून देण्यासाठी  राज्य शासन प्रयत्नशील आहे; तसेच प्रसिद्धीपासून दूर राहून विविध क्षेत्रात दूरगामी समाजहितासाठी सातत्यपूर्ण आणि समर्पित कर्तृत्व बजावणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असतात, अशा असामान्य व्यक्तींची  पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

 

पद्म पुरस्कार शिफारस समितीची मंत्रालयात आज मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले; तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi