Wednesday, 13 May 2026

नियोजित गडचिरोली विमानतळाच्या विकासासाठी मौजे मुरखळा, पुलखल व कनेरी

 शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी ३१.३८ हे.आर. जमीन विनामोबदला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला ३११.८१ हे.आर. जमीन संपादनासाठी भूसंपादन संस्था आणि अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांना जमीन संपादनासाठी प्राधिकृत करण्यात आल्याचे यात स्पष्ट केले आहे.

 

          या शासन निर्णयानुसार नियोजित गडचिरोली विमानतळाच्या विकासासाठी मौजे मुरखळा, पुलखल व कनेरी या गावांमधील जमिनीचे भूसंपादन करण्याकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस अंमलबजावणी यंत्रणा, भूसंपादन संस्था तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्याबाबत १३ डिसेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून गडचिरोलीत विमानतळ

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून गडचिरोलीत विमानतळ

·         नियोजित गडचिरोली विमानतळाच्या जमीन संपादनासाठी

१०४ कोटींच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता

 

नागपूर, दि.१२ : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीतून गडचिरोली येथे विमानतळ उभारण्यात येत आहे. नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खासगी व वन विभागाच्या अखत्यारितील ३११.८१ हे.आर. जमीन संपादित करण्यासाठी १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली.

 

        महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने नियोजित गडचिरोली विमानतळासाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी व वन विभागाची ३११.८१ हे.आर. जमीन संपादित करण्याकरिता १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या मान्यतेसाठी ठेवला होता. या समितीच्या ८ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील प्रशासकीय व वित्तीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात

 ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबई, दि. १२ :राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून हा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना व प्रतिक्रिया मागविण्यात याव्यात, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

 

विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व देण्यात येणाऱ्या सुविधाचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग उपसचिव वर्षा देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभाग अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, कामगार विभाग उपायुक्त संकेत कानडे, सार्वजनिक आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. आशिष भारती, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ प्रतिनिधी वंदना कोचुरे यांच्यासह महिला आयोगाच्या माजी सदस्य ॲड. संगीता चव्हाण उपस्थित होत्या.

 

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. कामगारांना गमबूट, इलेक्ट्रिक कोयता, ग्लोव्हज तसेच महिला कामगारांसाठी सॅनिटरी नॅपकिन यासारख्या आवश्यक साहित्याची खरेदी मान्सून सुरू होण्यापूर्वीच करावी व आवश्यक आर्थिक मदत डीबीटीच्या माध्यमातून तात्काळ वितरित करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला व बाल विकास प्रकल्पांना गती देण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

 महिला व बाल विकास प्रकल्पांना गती देण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. १२ : दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या महिला व बाल विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच विभागाची शासकीय कार्यालये उभारण्यासाठी मौजे मानखुर्द येथील सोसायटीच्या जमिनीचा भाडेपट्टा वाढवून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 

चेंबूर येथील दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागेवरील विविध संस्थांच्या कामकाजाचा तसेच पुनर्विकासासंदर्भातील आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास आयुक्त माधवी सरदेशमुख,  अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे तसेच एसआरए, बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बाल विकास विभागातील मंत्रालयीन अधिकारी आणि दि चिल्ड्रेन एड सोसायटीचे अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ही संस्था बाल न्याय व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असून मुंबई शहर व उपनगर परिसरात विविध बालगृहे, निरीक्षणगृहे, औद्योगिक शाळा, दिव्यांग बालगृहे तसेच शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या इमारतींना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच काही इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

 

संबंधित जमिनीचे लीज नूतनीकरण करून नव्याने बाल विकास प्रकल्प राबविण्यास परवानगी देण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

0000

धोत्रे येथे २२० के.व्ही. उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी

 धोत्रे येथे २२० के.व्ही. उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी

-ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. १२ : मौजे धोत्रे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे प्रस्तावित २२० के.व्ही. उपकेंद्राचे लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या.

 

एमएसआरडीसी निर्मलभवन येथे मौजे धोत्रे येथील २२० के.व्ही. उपकेंद्र तसेच मौजे वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे नवीन उपकेंद्र उभारणीसंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार काशिनाथ दाते, महापारेषणचे संचालक सतीश चव्हाण, कार्यकारी संचालक धनंजय औटेकर, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत आमदार दाते यांनी मतदारसंघातील ऊर्जा विभागाशी संबंधित विविध समस्या मांडल्या. त्यावर राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ऊर्जा विभागाच सुरू असलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना आवश्यक निर्देश देण्याचेही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उच्च गुणांची नोंद

 राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उच्च गुणांची नोंद केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने ९५.२० टक्के गुण मिळवले असून द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला ८६ टक्के गुण मिळाले. तसेच बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी ९४ टक्के, तर द्वितीय क्रमांकासाठी ९२.४० टक्के गुणांची नोंद झाली आहे. पुणे, सोलापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनीही ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी गुणवत्तापूर्ण निकाल लागल्याचे दिसून आले. नंदुरबार, लातूर, नाशिक आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी केली आहे.

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण · यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

 बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण

·         यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

 

मुंबई, दि. १२ : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा मार्ग अवलंबिला आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध बालगृहातील एकूण ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादित केले असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारत उल्लेखनीय यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच बालगृहांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, मार्गदर्शन आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. बालगृहातील या मुलांचे ऑनलाईन सेशन घेण्यात आले, तसेच त्यांचा सराव घेण्यात आला. शिक्षकांचे विशेष वर्ग या दहावीच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यानंतर मुंबई उपनगर येथील बालगृहातील ८८, अहिल्यानगर येथील ८०, तर बीड येथील ४७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. ठाणे जिल्ह्यात ४२, सोलापूर येथे ३९, तर कोल्हापूर येथे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Featured post

Lakshvedhi