Wednesday, 15 June 2022

पाणीपुरवठा

 चिकोत्रा लाभ क्षेत्रातील 52 गावांच्या समन्यायी पाणीवाटपप्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

            मुंबईदि. 14 : कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 52 गावांचा समन्यायी पाणीवाटपाच्या पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली जाईल व  मंत्रिमंडळाचा ठराव करुन मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईलअशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.

            कागल मतदारसंघाच्या चिकोत्रा प्रकल्पामध्ये समन्यायी तत्त्वावर पाणीवाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूतसहसचिव श्री. शुक्लामुख्य अभियंता श्री. गुणालेकोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. सुर्वेसमन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटीलसहसचिव मोहन पाटीलप्रकल्प समन्वयक जितेश मेमाने आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणालेचिकोत्रा पाणलोटातील 52 गावांच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करुन आरखडा तयार करा. या प्रकल्पातील गावांचे सर्व्हे करतांना पारदर्शकता आणि अचूकता असली पाहिजे. हा प्रकल्प दीर्घकालीन परिणाम करणारा असून आरखडा तयार करताना दक्षता घेण्यात यावीअशा सूचना श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ठराव करुन केंद्र सरकारला पाठविण्यात येईलअसे आश्वासन देखील श्री. पाटील यांनी समन्यायी पाणी हक्क परिषदेला दिले.

            गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिकोत्रा पाणलोटातील समन्यायी वाटपाच्या 52 गावांचा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे. चिकोत्रा धरणातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्यास आम्ही संमती दर्शवितोअसे समन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी  सांगितले.

            या भागातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने चिकोत्रा धरणालगतच्या गावांसाठी प्राथमिक स्तरावर पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याची संकल्पना जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी मांडली होती. या संकल्पनेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने  योजना राबवून प्रकल्प पूर्ण करता येणार असून या संकल्पनेला समन्यायी पाणी हक्क परिषदेनेही समर्थन दिले.

0000

रक्त पेढी


राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि. 14 : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

            महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., श्री साईबाबा शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले की, रक्ताला अद्यापही विज्ञानाने पर्याय दिलेला नाही. त्यामुळे रक्तदान केले पाहिजे. कोविडच्या कालावधीतही आपल्या राज्याने देशातील सर्वात जास्त युनिट रक्त संकलन केले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. राज्याच्या अनेक तालुक्यांत रक्तपेढी नाहीत, अशा तालुक्यात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल.

            अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी कोविडच्या कालावधीतही महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त संकलन केले आहे. याकाळात राज्यातील सर्व रक्तदाता यांनी अतिशय उर्त्स्फुतपणे रक्तदान केले. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रक्तदानातून साध्य होते. आई वडिलांच्या खालोखाल रक्तदानातून जोडले गेलेले नाते सर्वात पवित्र आहे. रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज आहेत, हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असे सांगितले.

            डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राज्यातील रक्तपेढी नसलेल्या भागात रक्तपेढी सुरू करण्यास सामाजिक संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

            यावेळी सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ अरुण थोरात, डॉ. अर्चना जोगेवार, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.


            या कार्यक्रमात रक्तदाते, रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.


***


 

 विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

 

            पुणे दि. 14 : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहेअसे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

            देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसआमदार चंद्रकांत पाटीलवारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकरजगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरेतुषार भोसले आदी उपस्थित होते.

            प्रधानमंत्री म्हणालेभारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहेयाचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण  केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्राथमिकता आहे.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा

            संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्त्वाची भूमिका आहे. संत तुकारामांची करुणादया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतातमार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल.

            प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरणजलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावेअसे आवाहन त्यांनी केले.

संत तुकाराम महाराज शिळा बोध आणि वैराग्याची साक्ष

            तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहेतर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.

            श्री.मोदी म्हणालेसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात आणि आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या दोन्ही एकूण ३५० किलोमीटरपेक्षा अधिक चौपदरी मार्गासाठी ११ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. शास्त्रात म्हटले आहे मानवजन्मात संतसंग सर्वात महत्वाचा आहेत्यांच्या सहवासात सुखाची अनुभूती असते. असा अनुभव देहूसारख्या तीर्थक्षेत्री आल्यावर मिळतो.

            नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले.

            प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे प्रकाशन करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरेविठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरसंत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी तिन्ही संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

            तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आणि ध्वजपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनी इंद्रायणी नदीभंडाराघोरवडेश्वर आणि भामगिरी टेकडीचे दर्शन घेतले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी संत तुकाराम महाराज लिखित अभंगगाथेची हस्तलिखित प्रत आणि पालखीचेही दर्शन घेतले.

000

<span lang="MR" style="font-size

 मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव

प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातीलसर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मराठी - गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

            मुंबई, दि. 14 : गेल्या २ वर्षात कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वच भाषेतल्या पत्रकारांनी, दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. भारतातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱ्या काळात सुद्धा वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल, अशी अपेक्षा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच्या काळात मराठी आणि गुजराती एकमेकांमध्ये दुधात साखरेप्रमाणे विरघळून गेले आहेत, त्यामुळे मराठी - गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे, हीच माझी सदिच्छा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

            भारतातील सर्वांत जुने वर्तमानपत्र अशी ओळख असणाऱ्या मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडला. द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासह मुंबई समाचार वृत्तपत्राचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

            मुंबई समाचार वृत्तपत्राचे अभिनंदन करून श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आहे. भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी वृत्तपत्राचे उद्दिष्ट राष्ट्रीयत्व जपणे हेच होते. मुंबई समाचार केवळ बातम्यांचे माध्यम नाही तर तो एक समाजाचा वारसा आहे. मुंबई समाचार वृत्तपत्रातून भारताचे दर्शन घडते. अनेक संकटाना तोंड देत भारत कशा प्रकारे अढळ राहिला, याचे दर्शन आपल्याला मुंबई समाचारमधूनही मिळते. येणाऱ्या काळात मुंबई समाचार आपली ही परंपरा टिकवून ठेवेल, असा विश्वास वाटतो. समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या देण्याचे, बातम्यांमधून लोकशिक्षण करण्याचे, समाज आणि सरकारमध्ये काही उणीवा असतील तर त्या वाचकांसमोर आणण्याचे काम वृत्तपत्रांचे आणि प्रसारमाध्यमांचे आहे.

            गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत असलेले मुंबई समाचार हे एक गुजराती वृत्तपत्र असले तरी सर्वसामान्य वाचकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे याचा आनंद आहे. मुंबई समाचारने स्वातंत्र्यचळवळीला आवाज दिला आणि नंतर स्वतंत्र भारताची प्रगती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली;भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुंबई समाचार वृत्तपत्राची २०० वर्षे एकाच वर्षी साजरा होणे हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई समाचार वृत्तपत्राने आपला इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर आणावा जेणेकरून आजच्या पिढीला भारताचा इतिहास समजण्यास मदत होईल, असेही श्री. मोदी म्हणाले.


            मुंबई समाचार वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा.

            आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे कठीण आहे. वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणे, पत्रकारांचे कर्तव्य असते आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहेत. मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

            मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की, सर्वात जुने वर्तमानपत्र अशी ओळख असलेले मुंबई समाचार २०० व्या वर्षात पर्दापण करीत आहे. १८२२ मध्ये बॉम्बे समाचार या नावाने साप्ताहिक म्हणून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. दक्षिण मुंबईतील फोर्ट संकुलाच्या मध्यभागी असलेल्या रेड हाऊस नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र अथा्र्त मुंबई समाचार २०० वर्षाचा टप्पा गाठत आहे.

            सलग २०० वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचारच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका स्मृती तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

 औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा

            मुंबई, दि. 14 : औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला.

            औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हसेकर, जे.एम.सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते.

            औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, प्रशासकीय अधिकारी व अधीक्षक यांच्या पात्रता निश्चित करण्यात करणे, कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी नियमितरित्या भरणे, रुग्णालयात मंजूर असलेल्या 1177 खाटांपेक्षा जास्त रुग्ण खाटा सुरु असल्याने निधीचा कमतरता, औषधी, सर्जिकल, यंत्रसामुग्री आणि उपकरणे, पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करणे अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग पदाची भरती बाबत जाहिरात देवून ती पदे तातडीने भरावी, असे निर्देश श्री.देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वैद्यकीय शिक्षण विभागातील अध्यापकीय पदे व वर्ग 3 व 4 गटातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही करावी. औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबतच्या विविध विषयांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करुन संबंधित विषयाला गती द्यावी, असे निर्देशही मंत्री श्री.देशमुख यांनी दिले.





Tuesday, 14 June 2022

रोजगार

 राज्यात मेमध्ये २१ हजार ५५६ युवकांना रोजगार

- कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि. 14 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२ मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

            विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे २०२२ अखेर ६८ हजार ४४३ उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

               मंत्री श्री. टोपे म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

            विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९५ हजार ४५० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. टोपे म्हणाले की, माहे मे 2022 मध्ये विभागाकडे ३३ हजार ६७७ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ६७९, नाशिक विभागात ४ हजार ३९५, पुणे विभागात १८ हजार १५८, औरंगाबाद विभागात २ हजार २२६, अमरावती विभागात १ हजार ५०० तर नागपूर विभागात १ हजार ७१९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

            माहे मेमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५५६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ०२७, नाशिक विभागात २ हजार ३२७, पुणे विभागात सर्वाधिक १४ हजार ३१३, औरंगाबाद विभागात ३३३, अमरावती विभागात ३४८ तर नागपूर विभागात २०८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

            नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले आहे.

०००

 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य सप्ताह

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

            मुंबई, दि. 14 : येत्या 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्यात स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत असून यामध्ये चार स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून हे कार्यक्रम नेमके कोणते असावेत, या कार्यक्रमांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा, कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी, प्रत्येक स्तरावर तो कार्यक्रम वेगळा कसा असेल याबाबतचे नियोजन पुढील बैठकीत सादर करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.


            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोअर समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक‍ न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे पद्धतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राज्यस्तरीय कोअर समिती आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची रुपरेषा ठरविणे तसेच निधीची उपलब्धता याबाबत निर्णय घेणार आहे.


            मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राज्यात “हर घर तिरंगा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 11 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये तिरंगा फडकवला जाण्याचे नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत सर्व तयारी करावी.साधारणपणे महाराष्ट्रासाठी दोन कोटी तिरंग्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे संविधानाचे नियम पाळून याबाबतची सर्व तयारी करण्यात यावी. येत्या 15 ऑगस्ट रोजी मरीन ड्राईव्ह येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त भारताची गेल्या 75 वर्षांतील प्रगती यावर आधारीत एका विशेष लेझर शोचे आयोजन करण्यासाठी तयारी करण्यात यावी. येत्या 9 ऑगस्ट रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र घेऊन एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन विधानभवनात करण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषीबरोबरच कामगार आणि उद्योगक्षेत्राची प्रगती यांचाही समावेश या आजादी का अमृत महोत्सवात केला जावा. तसेच गावपातळीवर यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांचा समावेश व्हावा अशा सूचना कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले की, आज महाराष्ट्रात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग हे आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळेच आजादी का अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य अभियान राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय कार्डियाक कॅथलॅब यासह आयुष्यमान हेल्थकार्डची अधिक नोंदणी यावरही भर देण्यात येणार आहे.

            सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्वाच्या अशा शाळा, वसतीगृहे आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य दोन योजनांचा समावेशही आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांनी केल्या. आजादी का अमृत महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमाची मांडणी माहितीपूर्ण असण्याबरोबरच आजच्या तरुणवर्गाला आकर्षित होण्यासाठी सामाजिक माध्यमांचा अधिक वापर करुन करण्यात यावा.

            मंत्री श्री.केदार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी सेवाग्राम आश्रम येथे शिक्षण विभागाच्या मदतीने चर्चासत्रे आयोजित करण्यात यावी, यामध्ये एनसीसी यांचाही समावेश करण्यात यावा.याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील एका शाळेचा ऐतिहासिक शाळा म्हणून समावेश करण्यात येणार असून संबंधित पालकमंत्री या शाळेची निवड करतील.

            आजादी का अमृत महोत्सवाचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यासाठी कोअर समितीचे सर्व मंत्री यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित सचिव यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात यासंबंधी विस्तृत बैठक घेतली जाईल.

            भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ 12 मार्च 2021 रोजी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकशाही मुल्ये आणि भारतीय संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. पुढील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.यापूर्वीच सर्व सरकारी पत्रव्यवहारामध्ये आझादी का अमृत महोत्सव हे संकेतचिन्ह वापरण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi