Wednesday, 18 August 2021

पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे · महाराष्ट्राचे पर्यटनवैभव जगासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार · एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेल्या पर्यटक निवासाचा तसेच गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ · मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार · सुलभ बुकींग सुविधा, साहसी पर्यटन तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मिळणार चालना मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नुतनीकरण झालेले पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ
राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 6 वी ते 9 वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू मुंबई, दि. 17 : राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या 39 एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूलमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गात अनुसूचित/आदिम जमातीच्या विदयार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक /मुख्याध्यापक यांनी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून प्रवेश घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या सदस्य सचिवांनी केले आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या वतीने राज्यातील 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व एकलव्य निवासी शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE),नवी दिल्ली यांचेशी संलग्न असून या शाळांमध्ये इ.6 वी ते 12 वी ( विज्ञान ) पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात. एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रतिवर्षी इ.6 वी च्या वर्गात एकूण 60 विद्यार्थ्यांना (30 मुले + 30 मुली ) नवीन प्रवेश देण्यात येतो,तसेच इ.7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यात येतो. या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील Student Id माहीत असणे आवश्यक आहे. राज्यातील विशेषत: शासकीय व अनुदानित आश्रमशाळेसह, जिल्हा परिषद,नगर पालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित / आदिम जमातीचे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता एकलव्य निवासी शाळेत इ.6 वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे इ.5 वी चे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे लागेल. राज्यातील कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार, पालकांचा मूळ राहण्याचा पत्ता विचारात घेऊन गुणानुक्रमे नजिकच्या एकलव्य शाळेत प्रवेश देण्यात येईल. राज्यातील अनुसूचित/ आदिम जमातीच्या ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. 6 लक्ष पेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरता येईल. प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत इ.6 वी च्या प्रवेशामध्ये अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3% जागा तसेच आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी इ.6 वी च्या प्रवेशामध्ये एकूण 5 जागा आरक्षित राहतील. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी नजिकच्या प्रकल्प कार्यालयास संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संत गाडगेबाबांच्या विचारसरणीवर काम करीत राहणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे · प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन · संत गाडगेबाबा यांचे विचार जगभर पोहचविण्याची गरज मुंबई, दि. 17 : श्री गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्यशासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या संत गाडगे महाराज मिशनच्यावतीने प्रकाशित दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा ॲड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते- पाटील आदी उपस्थित होते. संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला, असे सांगून मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्याना अन्न, तहानलेल्याना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आजोबा प्रबोधनकारांनी लिहिलेल्या आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ चितारलेल्या या जीवनचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यात एक अनोखे नाते होते. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शाळा उभारल्या, अन्नछत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मिशनने काम करत राहावे, महाराष्ट्र शासन मिशनच्या पाठीशी खंबीर उभे राहील, अशी ग्वाही श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली. महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, संत गाडगेबाबा हे कृतीमधील आणि विचारामधील स्वच्छता जोपासणारे संत होते. गाडगेबाबा, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा देशामध्ये पोहोचवायचा असेल तर त्यांचे पुस्तकरूपी जीवनचरित्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था व्हायला हवी. धर्म, जातीभेदांमध्ये वाढ करणाऱ्या विभाजनवादी शक्तींबाबत जनजागृती करायची असेल तर हे पुस्तक उपयुक्त ठरेल. गाडगेबाबांची 2026 मध्ये 150 वी जयंती असून त्यानिमित्ताने मिशनमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. मंजुश्री पवार आणि श्री. उल्हास पवार यांनी मनोगतामध्ये प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यातील विचार आणि कृतीतील साम्याविषयी भाष्य केले. जात-पात, धर्म यातील फोलपणा गाडगेबाबांनी आपल्या वाणीतून लोकांना दाखवून दिला. त्यासाठी लोकांच्या बोलीभाषेतून संवाद साधला. प्रबोधनकार, गाडगेबाबांचे विचार केवळ इतिहासाचे भाग नाही तर वर्तमानाला दिशा देणारे आहेत. वैयक्तिक हितसंवर्धनाशिवाय परिवर्तन होऊ शकते हे गाडगेबाबा आणि प्रबोधनकार यांनी सिद्ध केले, असेही सांगितले. यावेळी मिशनच्यावतीने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना संत गाडगेबाबा यांची प्रतिमा आणि संदेश असलेले सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. मंजुश्री पवार यांच्याकडून राजर्षी शाहूमहाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ भेट देण्यात आले.
फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे रोजगार, गुंतवणूक वाढेल - उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई, दि. 17 : ई कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच ठरेल, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व गुंतवणुकीतही वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे व्यक्त केला. कोविडमुळे मागील दीड वर्षांपासून अनेक उद्योगांचे विस्तार रखडलेले असताना फ्लिपकार्ट कंपनीने या संकटावर मात करत आपल्या प्रकल्पाचा विस्तार केला. ही बाब राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे. राज्याला उद्योगक्षेत्रात पुढे नेण्यासाठी फ्लिपकार्टने उचलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. याद्वारे गुंतवणुकीचा ओघ वाढेल, शिवाय बेरोजगार तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे श्री. देसाई म्हणाले. भिवंडी व नागपूर येथे प्रकल्प विस्तार करण्यात आला आहे. ग्राहकांची मागणी वाढू लागल्याने व वेळेत वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्पविस्तार करण्यात आला आहे. भिवंडी येथे सुमारे सात लाख चौरस फूट जागेवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याद्वारे चार हजार जणांना रोजगारांची संधी मिळणार आहे. दुसरा प्रकल्प नागपूर येथे होणार आहे. राज्यातील स्थानिक व्यापारी, विक्रेते व लघु, मध्यम उद्योगांमधून तयार होणाऱ्या वस्तुंना यामुळे बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी रजनीश कुमार यांनी व्यक्त केला. ००००
म्हाडाने तळीये गावातील घरांची पुनर्बांधणी विहित कालमर्यादेत करावी - गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड · सातही वाड्यांमधील 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडा 'प्री-फॅब' पद्धतीने करणार मुंबई दि. 17 : रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडाने विहित काल मर्यादेत 'प्री-फॅब' पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तळीये गावाच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योग राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले,तळीये गावातील घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास जागा उपलब्ध करून द्यावी.तसेच तेथे रस्ते, वीज, पाणी, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाने म्हाडास आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.त्यानुसार म्हाडाने लेआऊट तयार करून त्याचा विकास एजन्सी म्हणून करावा. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात तळीये येथे जाऊन जागेची पाहणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मुख्याधिकारी योगेश म्हसे, म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, उपसचिव सुनील तुंबारे उपस्थित होते.
माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी संस्थात्मक कार्य उभे रहावे - सभापती रामराजे नाईक-निंबाळकर · मुधोजी हायस्कूलच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबई, दि. 17: फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कूल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभरपेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. शालांत परीक्षा 1990 तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्वं माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी, अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्तांचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केली. विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती, श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कूल, तालुका फलटण जि. सातारा येथील 1990 च्या इयत्ता 10 वी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेने, आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर पोहोचलेल्या सह-अध्यायींचा सत्कार आयोजित केला. त्याप्रसंगी सत्कारमूर्ती आणि उपस्थितांना संबोधित करतांना सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर बोलत होते. विधानभवनातील, मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कौटुंबिक परंतु आगळ्यावेगळ्या समारंभामुळे उपस्थित फलटणकरांसह सर्वांच्याच मनात आनंदाचा ठेवा बनून राहिलेल्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचेहस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता खाडे-ढोले, मुंबई उच्च न्यायालयात वकीलीची 23 वर्षे पूर्ण केलेले ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे, तसेच श्रीमती विजया गाडे-सांगळे यांचे सुपुत्र आणि भारतातील पहिला विगन टेनिसपटू श्री.विश्वजित सांगळे यांचा 'स्नेहदर्पण' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्तींना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री.दिलीप ढोले, निवृत्त सह सचिव श्री.भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ.सिंगन, श्री.मोहन भोसले, श्री.प्रसन्न रुद्रवते, श्री.महेंद्र काज, साठे व रुईया कॉलेजचे प्राध्यापक श्री.चंद्रशेखर नेने, श्री.मनोज माने समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभामुळे समाजकार्यांत आणखी मोठे योगदान देण्याची प्रेरणा आणि बळ आम्हांला प्राप्त झाले अशी भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केली. या कार्यक्रमास श्री.नसीर शिकलगार, श्री.असीम तांबोळी, श्री.अमोल जोशी, श्री.मनिष निंबाळकर, श्री.किरण गोरे, श्रीमती शर्मिला चव्हाण, वि.स.पागे., संसदीय प्रशिक्षण केंद्र, संचालक श्री.निलेश मदाने, श्री.संजय खानोलकर यांचेसह मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दीपाली मनिष निंबाळकर,गौरवपत्राचे वाचन श्रीमती शितल साळे आणि आभारप्रदर्शन श्रीमती श्रध्दा सांगळे यांनी केले. ००००

Tuesday, 17 August 2021

लसीचे दोन डोस झाल्याशिवाय मतदान पण करू नका. तुम्हाला रांगेत पण उभ राहायची गरज नाही, मतदानाच्या आधी घरी येऊन डोस देतील ☝️☝️🤷‍♂️🤷‍♂️💉💉

Featured post

Lakshvedhi