Wednesday, 23 September 2026

नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करावी – मुख्यमंत्री

 नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील

स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि. २२ : राज्यातील उच्च शिक्षणाच्या सुविधा समन्यायी पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात आणि नवीन महाविद्यालये सुरू करता यावीत, यासाठी विद्यापीठांच्या पंचवार्षिक आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंचा समावेश करण्यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड) यांची बैठक मंत्रालयात झाली.या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, आमदार अतुल भातखळकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे (रुसा) प्रकल्प संचालक डॉ. बी. एन. पाटील, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि विविध शैक्षणिक संस्थांकडून विद्यापीठांकडे प्राप्त झालेल्या निवेदनांचा तसेच समाविष्ट करण्यात आलेल्या स्थळबिंदूंचा विचार करून २०२७-२८ च्या वार्षिक योजनेसाठी पंचवार्षिक आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंचा समावेश करण्यासाठी विद्यापीठांनी पात्र ठरविलेल्या स्थळबिंदूंची छाननी करण्याकरिता उपसमिती गठीत करावी. या समितीने सर्व आवश्यक निकष तपासून शासनाला अहवाल सादर करावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi