Monday, 6 July 2026

अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे

 अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे

-         मंत्री गिरीष महाजन

            मुंबई, दि. ६ : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,नागरिकांनी सतर्क रहावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

            मंत्री महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असून, ज्या ठिकाणी बोगदे, रस्ते किंवा इतर ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, त्या सर्व घटनांची चौकशी केली जाईल. राज्यभरात; तसेच मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. झाडांच्या छाटणीसह धोकादायक ठिकाणांवर मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य यंत्रणा सतर्क आहे.

            राज्यात काही भागांत विक्रमी पाऊस झाला असून, विशेषतः मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये मानखुर्दमधील दुर्घटनेतील सहा मृत्यूंचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi