Monday, 27 July 2026

बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत

 बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र;

अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       विदेशातून खंडणीच्या धमक्या देणाऱ्या साथीदारांवरही लवकरच कारवाई

 

            मुंबई, दि.30 : बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी प्रभावी कारवाई करत अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे. विदेशातून फोन करून व्यापाऱ्यांना खंडणीच्या धमक्या देणाऱ्या टोळीच्या इतर साथीदारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

 

            पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सदस्य अस्लम शेख यांनीही उपप्रश्न विचारला.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रिजू बिश्नोई आणि शुभम लोणकर यांचा शोध सुरू आहे. हे आरोपी भारताशी प्रत्यर्पण करार नसलेल्या देशांमध्ये राहत असून, किंवा विविध देशांतील दूरध्वनी क्रमांकांचा वापर करून व्यापाऱ्यांना खंडणीच्या धमक्या देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण नेटवर्कचा माग काढण्याचे काम सुरू असून संबंधित आरोपींपर्यंत लवकरच पोहोचता येईल.

 

            यापूर्वी या टोळीने वापरलेल्या भाडोत्री शूटरनाही अटक करण्यात आली असून, बिश्नोई टोळीची कारवाई देशभर सुरू असली तरी मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये ती अधिक सक्रिय आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून व्यापक कारवाई सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, फर्निचर दुकानावरील गोळीबार आणि व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांत तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तपासात एकूण 12 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

            या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर दोन व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खंडणीच्या धमक्या मिळालेल्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले असून, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. व्यापारी व नागरिकांच्या संयुक्त बैठका आयोजित केल्या जात असून, साध्या वेशातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi