रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’
- मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २० : रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आली होती. या पथदर्शी योजनेच्या धर्तीवर २२ जिल्ह्यातील ३१ महानगरपालिकांमध्ये फिरते पथक योजनेसाठी प्रस्ताव मागविण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात ‘फिरते पथक’ योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत मोबाईल वाहनांच्या माध्यमातून रस्त्यावरील बालकांना पौष्टिक आहार, आरोग्य सेवा, शिक्षण, मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच बालकांची आधार नोंदणी, समुपदेशन, मानसिक आधार आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती करण्यात येते. रस्त्यावरील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment