क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सुरक्षितता व संशोधन क्षेत्रात मोठे परिवर्तन
- मुख्य सचिव राजेश अग्रवाल
क्वांटम तंत्रज्ञानामुळे संगणन, सायबर सुरक्षितता, औषधनिर्मिती आणि शेतीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडणार असून, महाराष्ट्र शासन या क्षेत्रात सक्रियपणे काम करत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
क्वांटम संगणन पारंपरिक संगणनापेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करत असून, क्यूबिट्सच्या साहाय्याने एकाच वेळी अनेक गणना करण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण अत्यल्प वेळेत करता येते, असे त्यांनी सांगितले.
क्वांटम सुपरपोजिशनमुळे क्यूबिट एकाच वेळी शून्य आणि एक या दोन्ही स्थितीत राहू शकतो, ज्यामुळे संगणनाची गती घातांकी वाढते. याचा उपयोग औषध शोध, कृषी संशोधन आणि विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये होणार आहे. क्वांटम इनटँगलमेंट ही संकल्पना सुरक्षित संप्रेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यातील क्वांटम कम्युनिकेशन प्रणालींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. सध्याच्या क्रिप्टोग्राफी प्रणालींवर क्वांटम संगणनाचा प्रभाव पडू शकतो, मात्र त्याचवेळी क्वांटम आधारित सुरक्षितता उपाय विकसित होत असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले.
भारतामध्ये तसेच जागतिक स्तरावर क्वांटम संशोधन वेगाने प्रगती करत असून, 50 ते 100 क्यूबिट क्षमतेच्या प्रणाली विकसित होत आहेत. काही प्रगत संगणकांनी अत्यंत जटिल समस्या अल्पावधीत सोडविल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, विविध संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यासोबत सहकार्याने काम सुरू आहे. पुणे आणि मुंबई येथील प्रमुख संस्था या संशोधनात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, केंद्र सरकारकडूनही स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी सांगितले
No comments:
Post a Comment