भारतीय सेना सीमेवर शौर्याने कार्यरत आहे. सीमेवर उभारण्यात येणारा हा पुतळा जवानांना आणि देशवासीयांसाठी प्रेरणादायी ठरेल.
मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा पुतळा पुणे येथून रवाना झाला असून, त्याने पुणे - मुंबई - बडोदा - अहमदाबाद - उदयपूर - जयपूर असा प्रवास करत दिल्ली गाठली आहे. इथून पुढे हा रथ पानिपत आणि पठाणकोट मार्गे पुंछ येथे पोहोचणार आहे. या प्रवासात ठिकठिकाणी शिवप्रेमींकडून रथाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, प्रतापगड यांसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या 11 किल्ल्यांची आणि तमिळनाडूतील जिंजी अशा एकूण 12 किल्ल्यांची माती आणि पवित्र पाणी नेण्यात येत आहे.
या स्मारकाचे आणि पुतळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकार विपुल आणि विराज खटावकर यांनी या नऊ फूट उंच पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा उच्च दर्जाच्या फायबरपासून तयार करण्यात आला असून, त्याची रचना अत्यंत देखणी आणि प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अशाच प्रकारे पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर आता पुंछ येथे अधिक भव्य पुतळा बसवून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन 'आम्ही पुणेकर' संस्था, 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि 'श्री शिवशंभू विचार मंच' यांच्या वतीने करण्यात आले आहे. 'आम्ही पुणेकर' संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, विश्वस्त अखिल झांजले, विपुल कांबळे आणि संदीप मते यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. या कार्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे
No comments:
Post a Comment