Monday, 6 October 2025

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार

 नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे 'पद्मस्मरण' आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांना जाते. त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या भागात सहकार चळवळ पोहोचली, सहकारी साखर कारखाने पोहोचले, तिथला शेतकरी समाधानी झाला आणि त्या ठिकाणचे औद्योगीकरणदेखील चांगल्याप्रकारे झाले, इथला शेतकरी संपन्न झाला.


 पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळ पुढे नेण्यासोबत जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविण्याचे कार्य केले. राज्य शासनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा आणि त्यातून राज्यातील दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केला आहे. विदर्भामध्ये वैनगंगा - नळगंगा, तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम, उल्हास खोऱ्यातले समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल असे कार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री विश्वासाने म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi