जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईतील महापे येथे देशातील अत्याधुनिक ' जेम्स अँड ज्वेलरी' पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कच्या माध्यमातून 'जेम्स अँड ज्वेलरी' क्षेत्रातील व्यावसायिकांना, निर्यातदारांना सुविधा देऊन अधिकाधिक निर्यात वाढविण्यासाठी शासन काम करेल. तसेच हे क्षेत्र रोजगाराभिमुख बनविण्यासाठी 'जेम्स अँड ज्वेलरी ' संघटनेसोबत सहकार्याची शासनाची भूमिका आहे. भारतीय आभूषणे, दागिन्यांना मोठा इतिहास आहे. जगात बऱ्याच देशांमध्ये भारतीय दागिने निर्यात होतात. जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत आघाडीवर असून ही आघाडी टिकविण्यासाठी शासनाची धोरणे त्या पद्धतीने सुसंगत करण्यात येतील.
राज्य शासन 'इज ऑफ डूइंग बिजनेस'साठी नवीन उद्योगांना परवाना पद्धत, जागा खरेदी प्रक्रिया, सध्याच्या उद्योगांचे बळकटीकरण प्रक्रिया सोपी आणि कमी कालावधीची करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहे. त्यासाठी मंत्रालयात 'इज ऑफ डूइंग बिजनेस' वॉर रूमही तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून सुधारणा प्रकल्प कुठल्या टप्प्यावर आहे, कशा पद्धतीने करायची याबाबत नियमित आढावा घेण्यात येत असून राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनामधून भारतीय दागिन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. तसेच या क्षेत्रात नवीन संशोधन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment