खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर होणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ५ : राज्यातील खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी महसूल विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अवैध गौण खनिज उत्खननाला चाप लावण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
पुणे येथील गौण खनिज खाणपट्ट्यांच्या ड्रोनद्वारे मोजणीसंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर आणि पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे खाणपट्ट्यांचे अचूक सर्वेक्षण करण्यावर चर्चा झाली.
येत्या तीन महिन्यांत राज्यातील सर्व खाणपट्ट्यांची मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमामुळे कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पाला देखील गती मिळणार आहे. या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी लागेल आणि ती तातडीने ‘महाखनिज’ संकेतस्थळावर अपलोड केली जाईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment