Thursday, 24 August 2023

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायकसुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाराज्यातील कारागिरांना लाभदायक

सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.

- आर. विमला


            मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कारागिरांच्या हिताची असून राज्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सात लाख ग्रामीण कारागिरांना याचा थेट लाभ होणार असल्याचे मत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी व्यक्त केले.


            खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्यालयात आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यातील 311 कारागीर बलुतेदार संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला बोलत होत्या.


            नव्याने सुरु होत असलेल्या 'प्रधानमंत्री विश्वकर्मा' योजनेची सविस्तर माहिती देताना श्रीमती विमला म्हणाल्या की, "खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे राज्यात जवळपास सात लाख कारागीर नोंदणीकृत आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, शिल्पकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री आदी उद्योगांच्या कारागिरांचा समावेश आहे.


            केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण, आणि विद्यावेतन देखील मिळणार आहे याचा लाभ कारागिरांनी घ्यावा. या योजनेत मंडळाच्या कारागिरांनी जास्तीत जास्त सहभागी होणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कारागिरांना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


            या योजनेची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून मिळणार आहे. ही योजना ऑनलाईन उपलब्ध होणार असून आवश्यक ते कागदपत्रे आधारकार्ड, रेशनिंग कार्ड कारागिरांनी तयार ठेवावीत. कारागिरांना कारागीर म्हणून नवे ओळखपत्र या योजनेत दिले जाणार असून त्यामुळे 'कारागीर' म्हणून शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच या योजनेत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. जेणेकरून हस्तकला आणि कारागिरांना महत्व प्राप्त होईल. या योजनेबाबत अधिक माहिती मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात मिळेल.


            या सभेस राज्यातील बलुतेदार कारागीर संस्थांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आदी उपस्थित होते. मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी आभार मानले.


००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi