Saturday, 25 December 2021

 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 22 : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणी ॲपवर 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.

            राज्याती ई-पीक पाहणी ॲपीची सक्ती न करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य सर्वश्री संग्राम थोपटे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. थोरात म्हणाले की, ई-पीक पाहणी हे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूकता यासाठी महत्वाचे असून हा प्रयोग देशपातळीवरही अवलंबला जाईल अशी खात्री आहे. ई- पीक पाहणी हा कार्यक्रम टाटा ट्रस्टच्या सहकार्याने 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या पीक पाहणीचा उपयोग महसूल विभागाबरोबरच कृषी, पणन आणि नियोजन विभागाला होणार आहे. एका अँड्रॉईड फोनमधून साधारण 50 शेतकऱ्यांच्या पीकांची नोंदणी करण्यात येते त्यामुळे जेथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी नोंदणी करीत असताना विशेष काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना काही अडचणींमुळे ई-पीक पाहणी करता आली नाही तर तलाठी स्तरावरुन पूर्वीप्रमाणे पीक पेऱ्याची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अचूक पिकांच्या नोंदी गाव नमुना 12 मध्ये होणे आवश्यक असल्याने शेतकरी यांनी स्वत: ई पीक पाहणीद्वारे पीक पेरा नोंदविणे शेतकरी हिताचे आहे. 6 जिल्ह्यांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आलेले पीक पाहणी सर्वेक्षण यशस्वी होते का याचा सुद्धा अभ्यास करण्यात येईल, असेही श्री.थोरात यांनी सांगितले.

--

वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी व पंचनामे करण्यात येणार

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 22 : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पुन्हा करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

            अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुर्जी शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखडे, प्रकाश सोळंके, यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. थोरात म्हणाले की, जून आणि जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती खरडून गेलेली असताना यादीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत बोर्डावर प्रसिध्द केली होती. तसेच या यादीबाबत काही आक्षेप असल्यास 8 ऑगस्ट 2021 पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळविले होते. तसेच 5 ऑगस्ट 2021 रोजी प्राप्त आक्षेपांबाबत संयुक्त पथकाने शेतीची पाहणी आणि पंचनामा करुन प्राप्त आक्षेप विहीत कालावधीत निकाली काढलेले आहेत.

---

केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा

कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा

- कृषी मंत्री दादाजी भुसे

            मुंबई, दि. 22 : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

            जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य कुणाल पाटील, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. भुसे म्हणाले की, आंबिया बहार 2019-20 मध्ये केळी या फळपिकासाठी जळगाव जिल्ह्यातील 42 हजार 377 शेतकऱ्यांनी 54 हजार 354 हेक्टर क्षेत्राकरिता सहभाग नोंदविला होता. योजनेतील अटी- शर्ती आणि महावेध प्रकल्पामार्फत प्राप्त हवामानाच्या आकडेवारीनुसार 41 हजार 578 शेतकऱ्यांना 371.94 कोटी रुपये इतकी विमा नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आली आहे.

---

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi