'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता
विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 6 : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी 3.30 कोटी रुपये खर्च करणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमशीलतेला प्रोत्साहन देऊन त्यांना भविष्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना मिळून भविष्यातील संशोधक घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.