Wednesday, 20 May 2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान

 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान

 

मुंबई, दि. १९ : लोक भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित होत्या.

 

जागतिक फॅशन ब्रँड प्राडाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पल कलेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यात लिडकॉमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच राज्यातील पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कारागिरांसाठी नवीन रोजगार आणि जागतिक बाजारपेठेतील संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

या सत्कारप्रसंगी कारागीर प्रतिनिधी सौरभ पवार, सतीश सातपुते, विजय शिंदे, तानाजी कांबळे, संभाजी सातपुते, अनिता लोकरे, अरुण चापके, सुरेश आवळे, संदीप रोटे आणि अनिल पवार यांचा सन्मान करण्यात आला.

 

तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, मुख्य वित्त अधिकारी आनंद ऐनवाड, कारखाना व्यवस्थापक अमोल शिंदे, विक्री सल्लागार वैभव खाटे आणि जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांचाही गौरव करण्यात आला.

 

प्राडासोबतचे हे सहकार्य लिडकॉम टीम आणि कारागिरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चपलाया विशेष प्रकल्पांतर्गत प्राडाने कोल्हापुरी चपलांपासून सँडल्सचा संग्रह जगभरातील ४० निवडक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केला आहे. या सँडल्सची निर्मिती महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांकडून भारतातच केली जात आहे.

 

तसेच प्राडा संस्थेमार्फत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एनआयएफटी आणि कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी (केआयएलटी) येथे १८० कोल्हापुरी कारागिरांसाठी तीन वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला पूर्ण आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

 

या सन्मानामुळे महाराष्ट्र पारंपरिक कारागिरांचा वारसा जपणारे आणि त्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणारे राज्य म्हणून अधिक सक्षमपणे समोर आले आहे.

Tuesday, 19 May 2026

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ

 ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ

-         परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार

                                                                                   

मुंबई, दि. १९ : कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन ई-चलन प्रणाली, वेगमर्यादा नियम, एएनपीआर कॅमेरे तसेच दंड आकारणी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष  प्रदीप राठोड, सदस्य मनोज चौगुले, महेंद्र काळभोर, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, गौरव कुसाळे, रफिक रावथर, अशोक कुचकोरवी, राजु ढाले, सुनील मगदुम आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात जुन्या ई-चलनांची सरसकट रद्दबातल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादेचा पुनर्विचार, एएनपीआर कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, वाहनांमधील अंतराच्या नियमांमध्ये व्यवहार्य बदल तसेच दंडावरील चक्रवाढ पद्धत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहतूक व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वाहतूकदारांच्या अडचणी शासन गंभीरपणे ऐकत असून, नियमांची अंमलबजावणी करताना अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ई-चलन आणि वेगमर्यादा संदर्भातील तक्रारींबाबत संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागवून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच, रस्ते सुरक्षा अबाधित ठेवत वाहतूकदारांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली

करारामुळे होणारी अणुऊर्जा व रोजगार निर्मिती

 करारामुळे होणारी अणुऊर्जा व रोजगार निर्मिती

अदानी पॉवर लिमिटेड कंपनी राज्यात १ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल. तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या १२ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज २ लाख कोटी रुपयांचीगुंतवणूक करणार आहे. यामधून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती व एक लाखाच्यावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच एनटीपीसी लिमिटेड १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. यामध्ये ५ हजार रोजगार निर्मिती होईल. ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) राज्यात २ लाख  कोटींची गुंतवणूक करणार  आहे. यामधून  पाच हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि ३ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.  अशाप्रकारे राज्यात एकूण ६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून २५ हजार ४०० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा

  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये अणुऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीतून राज्य ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक वेगाने प्रगती करणार आहे. ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच लाभाची नसून त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर असणार आहे.

 कंपन्यांनी सामंजस्य करार प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. संबंधित कंपन्यांनी प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण करावे. या कामी राज्य शासनाचा संबंधित विभाग त्यांना सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

याप्रसंगी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

देशाला 'संपन्न ऊर्जा' राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार

 देशाला 'संपन्न ऊर्जा' राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार
  • २५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती
  • एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी

 

मुंबई, दि. १९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये राज्य शासनासोबत चार कंपन्यांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये एनटीपीसीएल (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड), अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपुर पावर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) यांचा समावेश आहे. बैठकीला पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवर कंपनीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण आदी उपस्थित होते

यूपीएससी वन सेवा परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश मुंबई, दि.

 यूपीएससी वन सेवा परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश

मुंबई, दि. १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत मार्गदर्शन घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ४ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात कबीर राहुल कांबळे यांनी १२५ वा तर अक्षय विजय बर्हे यांनी १४० वा क्रमांक मिळवत यश प्राप्त केले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय बार्टी संस्थेकडून मिळालेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्याला दिले आहे.

बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना यूपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत चाचणीच्या तयारीसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. भारतीय वन सेवा २०२५ मुख्य परीक्षेसाठी ५२ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले होते, तर त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी मुलाखत आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतला होता.

या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या विविध टप्प्यांवर बार्टी संस्थेकडून तज्ज्ञ मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यास मोठी मदत झाली.

बार्टीच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करून प्रशासकीय सेवेत प्रवेश करणाऱ्या या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे 'बार्टी'च्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे आणि विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

बोरीवली (पश्चिम) येथे 22 मे रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 बोरीवली (पश्चिम) येथे 22  मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मुंबई, दि. 19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली कॉलेज, बोरीवली (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मे २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा सायली कॉलेज, गोराई रोड, एम.एच.बी. कॉलनी, गोराई नगर, बोरीवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात मुंबईतील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच प्राथमिक निवड प्रक्रियाही याच ठिकाणी पार पडणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध महामंडळांच्या योजनांची माहिती देण्यात येणार असून उमेदवारांना मोफत प्रशिक्षणाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच प्रधानमंत्री इंटर्न योजना अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच आयटीआय व विविध शाखांतील पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त रोलेक्स अर्जुनराव भगत यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi