Monday, 16 October 2023

💐साबीर करीम शेख,धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भरदार आवाज, स्पष्टवक्तेपणा व धाडसी वृत्ती, पुण्य स्मरण

 💐💐स्वर्गस्थ💐💐

                  आपल्या महाराष्ट्रात आज हजारोंच्या संख्येने गिर्यारोहण संस्था अस्तित्वात आहेत. या संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून गेली चार दशके अथकपणे सुरू आहे. या कार्यात प्रारंभीपासून सक्रिय राहून साथ देणारे अनेक जाणते गिर्यारोहक व संस्था-संघटना आजही त्याच उत्साहात कार्यरत आहेत. 

                  मात्र महासंघाची स्थापना करण्यात स्वर्गीय साबीर शेख यांचे  मोठे योगदान होते. 

                 सच्चे शिवप्रेमी गिर्यारोहक, आणि मंत्रीपद भूषविलेल्या साबीर भाईंबरोबर भटकंती करण्याची संधी मला वेळोवेळी मिळाली. साबीर भाईंचे आज पुण्यस्मरण करताना काही आठवणी जाग्या झाल्या आहेत………..


           💐साबीर करीम शेख💐

                  धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भरदार आवाज, स्पष्टवक्तेपणा व धाडसी वृत्ती, ही साबीर भाईंची स्वभाव  वैशिष्ट्ये होती. मुळात हे राजकारणातले व्यक्तिमत्व. पण ते दूर्गवेडे होते. श्रीशिवरायांविषयी भाईंना विशेष आदर होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर त्यांची निष्ठा होती. बाळासाहेबांनीही भाईंच्या निष्ठेची जाण ठेवून त्यांना कल्याण-ठाणे परिसरातुन सेनेचा उमेदवार म्हणून विधानसभेवर जाण्याची संधी दिली. भाई  भरघोस मतांनी  निवडूनही आले. नंतर कामगार मंत्री म्हणून कार्यरत झाले. 

                 ही राजकीय कारकीर्द सोडली तर भाई हाडाचे गिर्यारोहक होते. गो. नी. दांडेकरांसमवेत भाई नेहेमी दुर्गभ्रमण करायचे. रायगडावर भाईंनी  कितीदा मुक्काम केला होता. गड- गावातील लहानथोर मंडळी, सरकारी सेवक, यांचेशी साबीर भाईंचे जिव्हाळ्याचे नाते होते. गडावर भाई आले की सर्वांना उत्साह यायचा. 

                 भाई स्वतः कीर्तन- प्रवचन करायचे, व्याख्यानही द्यायचे. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा इतिहास त्यांना तारखेसह पाठ होता. ते भरदार आवाजात पोवाडा म्हणायचे. 

                पुण्याजवळील राजगड ही स्वराज्याची जुनी राजधानी. वाय. झेड. ट्रेकर्स या प्रसिध्द गिर्यारोहण संस्थेने १९८५ साली पहिल्यांदा राजगडावर ‘गड जागरण मोहीम’ आयोजीत केली. सर्वदूर महाराष्ट्रातील गिरिप्रेमीनी त्यात सहभाग घेऊन राजगड जागता ठेवला होता. 

                 या गड जागरण मोहिमेत ‘गोनीदां’ सह साबीर भाई सक्रीय सहभागी होते. राज्यभर हे गड जागरण गाजले. मुंबई दूरदर्शनने याची खास दखल घेऊन त्यांची टीम चित्रीकरणासाठी गडावर पाठविली होती. नंतर दूरदर्शनवर प्रसारित झालेला हा सोहोळा लाखो प्रेक्षकांनी पाहिला. 

                 राजगडावर त्या वेळी झालेल्या समारंभात साबीर भाईनी दमदार आवाजात म्हटलेला पोवाडा व त्याला आम्ही दिलेली ‘जी जी रं…...’ ची ललकारी आजही कानात रुंजत आहे. 

                 गढवाल हिमालयात १९८८ साली साद माऊंटेनिअर्सने रुदुगैरा या १९,०९० फूट उंचीच्या हिमशिखरावर चढाई मोहीम आखली. भाई या मोहिमेचे फिल्ड ऑफिसर होते. 

                 ही गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली तेव्हा महाराष्ट्र दिनी श्रीगंगोत्री मंदिर प्रांगणात विशेष सोहोळा संपन्न झाला. साबीर भाईंनी त्या दिवशी सर्वांना शिवमुद्रा प्रदान करून त्यांचा गौरव केला. त्या समयी भाईंनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत म्हटले होते.

                  साबीर भाईना दत्तक मुलगी होती. तीच्यावर भाईंचा भारी जीव. मंत्रीपदी असताना भाईंनी त्यांच्या मंत्रालया समोरील कौलारू बंगल्यावर साऱ्यांना मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने बोलाविले होते.

                 वाढदिवस कसा साजरा करावा याचा आदर्श वस्तुपाठ त्या दिवशी आम्हाला पाहायला मिळाला. भाईंनी आपल्या मुलीला मध्यभागी बसवले व तिच्या हस्ते सुबक पणती प्रज्वलित केली. जमलेल्या साऱ्यांनी पणतीमध्ये चमचाभर तेल ओतून मुलीला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भाईंनी केले. किती छान कल्पना होती वाढदिवसाची ! आपण वाढदिवसाच्या दिवशी महागडा केक आणून त्यावर मेणबत्ती पेटवतो व ती नंतर विझवतो. केवढा विरोधाभास आहे हा !

                 दिलदार स्वभावाची ही व्यक्ती चित्रपट क्षेत्रात सुध्दा सक्रीय होती. स्वर्गीय दादा कोंडके व भाई परममित्र. पुण्याजवळील दादांच्या त्यावेळच्या स्टुडिओमध्ये दोघे खुपदा जायचे.

                  विखुरलेल्या दुर्गवेड्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न साबीर भाईंनी केले. दादरच्या सेना भवन सभागृहात या संदर्भात एकदा मोठी मिटींगही झाली होती. 

                   भारतीय एव्हरेस्ट मोहिमेच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने महासंघाने मुंबईत एका पदयात्रेचे आयोजन करून आमंत्रित टीम मेंबर्सना सन्मानित केले होते .                              

                   कल्याण जवळील दुर्गाडी-कोण परिसरात साबीर भाईंचे मोठे घर होते. भावाचा खाटीक व्यवसाय होता. धार्मिक सणाला भाईंचे आग्रहाचे आमंत्रण असायचे, त्या दिवशी बिर्याणी, शिरकुर्मा भाई सर्वांना प्रेमाने खाऊ घालायचे. आपल्या प्रत्येक भेटीत सुरक्षा यंत्रणेला बाजूस सारून सर्व सवंगड्यांशी मनसोक्त गप्पा मारण्याचा भाईंचा स्वभाव होता.

                   अशा या उमद्या व्यक्तीची अखेर मात्र दुःखद झाली. साबीर भाईंना आजारपणाने ग्रासले. शेवटी स्मृतीभंशही झाला. त्याच अवस्थेत १५ ऑक्टोबर २०१४  ला भाईंचे निधन झाले.

              आज महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राशी बांधिलकी मानणाऱ्या सर्वांना साबीर भाई, गोनीदा, बाबासाहेब या त्रिमूर्ती प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आता बऱ्याच अंशी स्थिरस्थावर झाला आहे. 

              महासंघाची पुढील वाटचाल करताना आम्हा दूर्गवेड्यांना या त्रिमूर्ती सदैव स्मरणात राहतील.

 || साबीर भाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ||

- मंगेश चौधरी

नऊ रात्रीच्या नऊ देविया

 


थप्पड जोरोसे लागी

 एक अतिशय सुंदर स्त्री विमानात शिरली आणि आपली जागा शोधू लागली.


आणि तिच्या लक्षात आलं की तिच्या शेजारच्या जागेवर बसलेल्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. त्या दिव्यांग माणसाजवळ बसायला त्या महिलेने नकार दिला.


'सुंदर' महिला एअर होस्टेसला म्हणाली, "मला या सीटवर आरामात प्रवास करता येणार नाही. कारण शेजारच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचे दोन्ही हात नाहीत." सुंदर महिलेने एअर होस्टेसला तिची सीट बदलण्याची विनंती केली. "जे लोक मला आवडत नाहीत अशा लोकांच्या शेजारी बसून मी प्रवास करू शकणार नाही."

सुशिक्षित आणि सभ्य दिसणाऱ्या महिलेकडून हे उत्तर ऐकून एअर होस्टेस आश्चर्यचकित झाली.


त्या महिलेने पुन्हा एकदा एअर होस्टेसकडे आग्रह धरला की "मी त्या सीटवर बसू शकत नाही. त्यामुळे मला दुसरी जागा द्यावी."


एअर होस्टेसने आजूबाजूला पाहिले, पण एकही सीट रिकामी दिसली नाही.


एअर होस्टेस त्या बाईला म्हणाली, "मॅडम, या इकॉनॉमी क्लासमध्ये जागा रिकाम्या नाहीत, पण प्रवाशांच्या आरामाची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मी विमानाच्या कॅप्टनशी बोलते. तोपर्यंत थोडा धीर धरा.” एवढे बोलून ती कॅप्टनशी बोलायला गेली.


काही वेळाने परत आल्यावर ती त्या महिलेला म्हणाली, "मॅडम! तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे. या संपूर्ण विमानात एकच सीट रिकामी आहे आणि ती आहे, फर्स्ट क्लासची! मी आमच्या टीमशी बोलले आणि आम्ही एक असाधारण निर्णय घेतला आहे. आमच्या कंपनीच्या इतिहासात प्रथमच इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला प्रथम श्रेणीत हलवण्याची घटना घडत आहे."


ती 'सुंदर' स्त्री खूप आनंदी झाली, पण ती तिची प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधीच एअर होस्टेस त्या हात नसलेल्या प्रवाशाकडे गेली आणि त्याला नम्रपणे विचारले, “सर, तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये जायला आवडेल का… कारण उद्धट प्रवाशासोबत प्रवास करून तुमची गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही."


हे ऐकून सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. त्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या स्त्रीने आता लाजेने मान खाली केली.



तेव्हा तो दिव्यांग उभा राहिला आणि म्हणाला, "मी एक माजी सैनिक आहे. एका ऑपरेशन दरम्यान काश्मीर सीमेवर झालेल्या बॉम्बस्फोटात मला माझे दोन्ही हात गमवावे लागले. सुरुवातीला जेव्हा मी या देवीजींचे म्हणणे ऐकले तेव्हा, मी विचार करत होतो की मी सुद्धा कोणाच्या सुरक्षेसाठी माझा जीव धोक्यात घालून हात गमावले..? पण तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर आता मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी माझ्या प्राणाची आहुती दिली आणि दोन्ही हात गमावले." आणि असे म्हणत तो फर्स्ट क्लासला गेला.


त्या 'सुंदर' बाईने प्रवास पूर्ण होईपर्यंत मान वर केली नाही.


जर विचारांमध्ये औदार्य नसेल तर अशा सौंदर्याला किंमत नाही!


नमोस्तुते !

चार्ली चॅप्लिन 4 विधाने

 *सु - प्रभात*


"चार्ली चॅप्लिन" चे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

त्याने आम्हाला 4 विधाने सोडली:

(१) या जगात काहीही शाश्वत नाही, अगदी आपल्या समस्याही नाहीत.

(२) मला पावसात फिरायला आवडते, कारण माझे अश्रू कोणी पाहू शकत नाही.

(३) आयुष्यातील सर्वात वाया जाणारा दिवस म्हणजे आपण हसत नाही तो दिवस.

(४) जगातील सहा सर्वोत्तम डॉक्टर...

 1. सूर्यप्रकाश,

 २. विश्रांती,

 ३. व्यायाम,

 4. आहार,

 5. स्वाभिमान

 6. मित्र.

त्यांना तुमच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यावर ठेवा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या.

चंद्र दिसला तर देवाचे सौंदर्य दिसेल.

जर तुम्ही सूर्य पाहिला तर तुम्हाला देवाची शक्ती दिसेल.

जर तुम्ही आरशात पाहिले तर तुम्हाला देवाची सर्वोत्तम निर्मिती दिसेल.

तेव्हा विश्वास ठेवा.

आम्ही सर्व पर्यटक आहोत, देव आमचा ट्रॅव्हल एजंट आहे ज्याने आमचा प्रवास, बुकिंग आणि गंतव्यस्थाने आधीच बनवली आहेत.

त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या.

आयुष्य म्हणजे फक्त एक प्रवास!

आजच जगा!!!! 🙏🌷

Sunday, 15 October 2023

थेरोंदा अग्लेचीवडी,अलिबाग नवरात्र उत्सव

थेरोंदा अग्लेचीवडी


देवी

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ

 आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ

                                                                    :मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबईदि.१५: महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी 'आठवडे बाजारमहत्वाची भूमिका बजावतीलमुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

            जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री साठी 'आठवडे बाजाराचेकार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहिला बचत खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात जिथे जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचाही लाभ या बचतगटांना मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे,  असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.  

            अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले कीगोरेगाव येथेही बचत गटांसाठी आठवडी बाजार लवकरच सुरू करणार आहोत. या बचतगटांना महापालिकेतर्फे वीस हजार रूपये अनुदान देण्यात आले असून बचत गटांना ब्रॅण्डींग करण्यासाठी महापालिकेतर्फे पूर्णपणे सहकार्य केले जाईल. गोरेगाव मध्ये नोकरी करणा-या महिलांसाठी वॅर्किंग वुमन हॉस्टेलही लवकरच सुरू होणार आहे. तसेच ज्या महिला घरकाम करतात अशा महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर बालसंगोपन केंद्रही सूरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना शासनस्तरावर  सहकार्य करण्यात येणार असून स्व:ताचा उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान अथवा कर्ज दिले जाईल. तसेच ज्या महिला घरी बसून शिलाई मशिन अथवा कांढप यंत्र चालविणे असे काम करू इच्छितात अशा पात्रता धारक महिलांसाठी १०२ कोटी रूपयांची तरतूदीतून त्यांना साहित्य वितरण करण्यात येईल, असेही डॉ.शिंदे म्हणाले.

            या कार्यक्रमाला नगरसेवक पंकज यादवअभिजित सामंतअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदेसंचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकरएशिया पॅसिफिक लीड पब्लिक सेक्टर इनोवेशनच्या (यूएनडीपी) श्रीमती आफ्रिन सिद्दीकीपब्लिक डिप्लोमसी ऑफिसर (वाणिज्य दूत कार्यालयअमेरिका ) श्रीमती सीटा रैटा उपस्थित होते.

****

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

                                         -मंत्री दीपक केसरकर

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईदि.15:  माजी राष्ट्रपती दिवंगात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालय येथे डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी वाचन संस्कृती रुजण्यासाठी आणि वाढविण्यासाठी राज्यात लवकरच वाचन चळवळ’ उभी करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.

 यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधवअवर सचिव अजय भोसलेकक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकरसहायक कक्षधिकरी राजेंद्र बच्छावविजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, वाचनाची चळवळ ही संपुर्ण देशात उभी रहावी यासाठी देशात रीड इंडिया ही चळवळ राबविली जात आहे. याच धर्तीवर राज्यात ही चळवळ उभी राहवी यासाठी लवकरच वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी उपक्रमाची सुरूवात मुंबई शहरातून करण्यात आली असून राज्यात तळागाळापर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थी आणि तरूण पीढीपर्यंत राज्यातील  मराठी साहित्य, थोर महापुरूष तसेच शुर, सरदारांचा  इतिहास आणि जेष्ठ शास्त्रज्ञ यांचे कार्य समजावे यासाठी प्रत्येक शाळेत पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक वाचन केले जाते त्या ठिकाणी जास्त शास्त्रज्ञ घडतात. यासाठी मराठी भाषा भवनाचे काम लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विश्व मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषेची महती जगभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्‍यात येत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे उत्तम लेखक, शास्त्रज्ञ तर होतेच याचबरोबर ते उत्तम वाचकही होते.  वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून ते जनसामान्यांशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचे हे कार्य भावी पीढीसाठी दिशा देणारे ठरले. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज राज्यात सर्वत्र 'वाचन प्रेरणा दिनम्हणून साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.           

०००

 

           


 

                                                            


Featured post

Lakshvedhi