Monday, 16 October 2023

💐साबीर करीम शेख,धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भरदार आवाज, स्पष्टवक्तेपणा व धाडसी वृत्ती, पुण्य स्मरण

 💐💐स्वर्गस्थ💐💐

                  आपल्या महाराष्ट्रात आज हजारोंच्या संख्येने गिर्यारोहण संस्था अस्तित्वात आहेत. या संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून गेली चार दशके अथकपणे सुरू आहे. या कार्यात प्रारंभीपासून सक्रिय राहून साथ देणारे अनेक जाणते गिर्यारोहक व संस्था-संघटना आजही त्याच उत्साहात कार्यरत आहेत. 

                  मात्र महासंघाची स्थापना करण्यात स्वर्गीय साबीर शेख यांचे  मोठे योगदान होते. 

                 सच्चे शिवप्रेमी गिर्यारोहक, आणि मंत्रीपद भूषविलेल्या साबीर भाईंबरोबर भटकंती करण्याची संधी मला वेळोवेळी मिळाली. साबीर भाईंचे आज पुण्यस्मरण करताना काही आठवणी जाग्या झाल्या आहेत………..


           💐साबीर करीम शेख💐

                  धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भरदार आवाज, स्पष्टवक्तेपणा व धाडसी वृत्ती, ही साबीर भाईंची स्वभाव  वैशिष्ट्ये होती. मुळात हे राजकारणातले व्यक्तिमत्व. पण ते दूर्गवेडे होते. श्रीशिवरायांविषयी भाईंना विशेष आदर होता. स्व. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेवर त्यांची निष्ठा होती. बाळासाहेबांनीही भाईंच्या निष्ठेची जाण ठेवून त्यांना कल्याण-ठाणे परिसरातुन सेनेचा उमेदवार म्हणून विधानसभेवर जाण्याची संधी दिली. भाई  भरघोस मतांनी  निवडूनही आले. नंतर कामगार मंत्री म्हणून कार्यरत झाले. 

                 ही राजकीय कारकीर्द सोडली तर भाई हाडाचे गिर्यारोहक होते. गो. नी. दांडेकरांसमवेत भाई नेहेमी दुर्गभ्रमण करायचे. रायगडावर भाईंनी  कितीदा मुक्काम केला होता. गड- गावातील लहानथोर मंडळी, सरकारी सेवक, यांचेशी साबीर भाईंचे जिव्हाळ्याचे नाते होते. गडावर भाई आले की सर्वांना उत्साह यायचा. 

                 भाई स्वतः कीर्तन- प्रवचन करायचे, व्याख्यानही द्यायचे. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा इतिहास त्यांना तारखेसह पाठ होता. ते भरदार आवाजात पोवाडा म्हणायचे. 

                पुण्याजवळील राजगड ही स्वराज्याची जुनी राजधानी. वाय. झेड. ट्रेकर्स या प्रसिध्द गिर्यारोहण संस्थेने १९८५ साली पहिल्यांदा राजगडावर ‘गड जागरण मोहीम’ आयोजीत केली. सर्वदूर महाराष्ट्रातील गिरिप्रेमीनी त्यात सहभाग घेऊन राजगड जागता ठेवला होता. 

                 या गड जागरण मोहिमेत ‘गोनीदां’ सह साबीर भाई सक्रीय सहभागी होते. राज्यभर हे गड जागरण गाजले. मुंबई दूरदर्शनने याची खास दखल घेऊन त्यांची टीम चित्रीकरणासाठी गडावर पाठविली होती. नंतर दूरदर्शनवर प्रसारित झालेला हा सोहोळा लाखो प्रेक्षकांनी पाहिला. 

                 राजगडावर त्या वेळी झालेल्या समारंभात साबीर भाईनी दमदार आवाजात म्हटलेला पोवाडा व त्याला आम्ही दिलेली ‘जी जी रं…...’ ची ललकारी आजही कानात रुंजत आहे. 

                 गढवाल हिमालयात १९८८ साली साद माऊंटेनिअर्सने रुदुगैरा या १९,०९० फूट उंचीच्या हिमशिखरावर चढाई मोहीम आखली. भाई या मोहिमेचे फिल्ड ऑफिसर होते. 

                 ही गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली तेव्हा महाराष्ट्र दिनी श्रीगंगोत्री मंदिर प्रांगणात विशेष सोहोळा संपन्न झाला. साबीर भाईंनी त्या दिवशी सर्वांना शिवमुद्रा प्रदान करून त्यांचा गौरव केला. त्या समयी भाईंनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत म्हटले होते.

                  साबीर भाईना दत्तक मुलगी होती. तीच्यावर भाईंचा भारी जीव. मंत्रीपदी असताना भाईंनी त्यांच्या मंत्रालया समोरील कौलारू बंगल्यावर साऱ्यांना मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने बोलाविले होते.

                 वाढदिवस कसा साजरा करावा याचा आदर्श वस्तुपाठ त्या दिवशी आम्हाला पाहायला मिळाला. भाईंनी आपल्या मुलीला मध्यभागी बसवले व तिच्या हस्ते सुबक पणती प्रज्वलित केली. जमलेल्या साऱ्यांनी पणतीमध्ये चमचाभर तेल ओतून मुलीला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भाईंनी केले. किती छान कल्पना होती वाढदिवसाची ! आपण वाढदिवसाच्या दिवशी महागडा केक आणून त्यावर मेणबत्ती पेटवतो व ती नंतर विझवतो. केवढा विरोधाभास आहे हा !

                 दिलदार स्वभावाची ही व्यक्ती चित्रपट क्षेत्रात सुध्दा सक्रीय होती. स्वर्गीय दादा कोंडके व भाई परममित्र. पुण्याजवळील दादांच्या त्यावेळच्या स्टुडिओमध्ये दोघे खुपदा जायचे.

                  विखुरलेल्या दुर्गवेड्यांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न साबीर भाईंनी केले. दादरच्या सेना भवन सभागृहात या संदर्भात एकदा मोठी मिटींगही झाली होती. 

                   भारतीय एव्हरेस्ट मोहिमेच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने महासंघाने मुंबईत एका पदयात्रेचे आयोजन करून आमंत्रित टीम मेंबर्सना सन्मानित केले होते .                              

                   कल्याण जवळील दुर्गाडी-कोण परिसरात साबीर भाईंचे मोठे घर होते. भावाचा खाटीक व्यवसाय होता. धार्मिक सणाला भाईंचे आग्रहाचे आमंत्रण असायचे, त्या दिवशी बिर्याणी, शिरकुर्मा भाई सर्वांना प्रेमाने खाऊ घालायचे. आपल्या प्रत्येक भेटीत सुरक्षा यंत्रणेला बाजूस सारून सर्व सवंगड्यांशी मनसोक्त गप्पा मारण्याचा भाईंचा स्वभाव होता.

                   अशा या उमद्या व्यक्तीची अखेर मात्र दुःखद झाली. साबीर भाईंना आजारपणाने ग्रासले. शेवटी स्मृतीभंशही झाला. त्याच अवस्थेत १५ ऑक्टोबर २०१४  ला भाईंचे निधन झाले.

              आज महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्राशी बांधिलकी मानणाऱ्या सर्वांना साबीर भाई, गोनीदा, बाबासाहेब या त्रिमूर्ती प्रेरणास्थानी राहिल्या आहेत. महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आता बऱ्याच अंशी स्थिरस्थावर झाला आहे. 

              महासंघाची पुढील वाटचाल करताना आम्हा दूर्गवेड्यांना या त्रिमूर्ती सदैव स्मरणात राहतील.

 || साबीर भाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ||

- मंगेश चौधरी

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi