Wednesday, 26 July 2023

राज्यात बर्ड फ्लूच्या H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही

 राज्यात बर्ड फ्लूच्या H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही


— अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे


            मुंबई, दि. 25 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोगाचा प्रादुर्भाव नाही, असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            अंडी व कुक्कुटमांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


             केंद्र सरकारच्या बर्ड फ्लूच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून बर्ड फ्लू सर्वेक्षणाकरिता नमुने प्रामुख्याने परसातील कुक्कुट पक्षी, व्यापारीतत्वावर पाळण्यात येणारे पक्षी, पक्षांचे बाजार, स्थलांतरित पक्षांचे मार्ग, पाणवठ्याच्या जागा जिथे स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्रित येतात, प्राणीसंग्रहालये, जंगल या ठिकाणांहून पक्ष्यांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. गेल्यावर्षी राज्यामध्ये एकूण २३,३९३ इतके नमुने यादृच्छिक (Randorm) पद्धतीने गोळा करून त्याची तपासणी केलेली आहे, ज्यामध्ये एकाही पक्ष्याचे नमुने H5N1 विषाणूसाठी होकारार्थी आढळून आलेले नाहीत.


            बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचनेनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतात.


            राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षांमध्ये मरतूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरतूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तत्काळ जवळच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ यावर त्वरित दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.


            प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमाच्या कलम ४(५) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तूस्थितीची माहिती जवळच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती जवळच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.


००००

Tuesday, 25 July 2023

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू

 राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


          मुंबई दि. 25 : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.


          राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.


          मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षण अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणीच्या (टेट) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.


          यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम असा आहे, जाहिरात देण्याचा कालावधी 15/08/2023 ते 31/08/2023,उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे. 01/09/2023 ते 15/09/2023, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. 10/10/2023, मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे. दि. 11/10/2023 ते दि. 21/10/2023, पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे. दि. 21/10/2023 ते 24/10/2023 असे आहे.


          तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना 7 जुलै 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.


          या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.



बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेनुकसान होणार नाही

 बार्टीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेनुकसान होणार नाही


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 25 : बार्टीमध्ये विविध प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवड करण्यात येते. मात्र, सध्या संस्थांच्या निवडीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले, विद्यार्थी हित जोपासण्यासाठी संस्था निवड प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण राबविण्याकरिता वित्त विभागाची वित्तीय नियमावली व उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि.१ डिसेंबर २०१६ रोजीच्या खरेदी धोरणानुसार व केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संस्था निवडीकरीता ई-निविदा प्रक्रिया शासनाचे धोरण आहे. सद्य:स्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.


            तरीही या विषयासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, विद्यार्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


             यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, जयंत पाटील, अॅड.अनिल परब, महादेव जानकर, जयंत पाटील, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण करणार

 वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण करणार


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई दि. 25 : वाळूज ते कमळापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रस्त्याच्या दुरूस्तीचे प्रलंबित काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.


          वाळूज ते कमळापूर येथील रस्ता दुरुस्तीच्या कामासंदर्भात सदस्य सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.


          मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, वाळूज ते कमळापूर या 4 कि.मी. लांबीपैकी 3 कि.मी. लांबीतील रस्ता दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीत आहे. या कामाला निधीही मंजूर आहे. या रस्त्यावर 1 कि.मी. लांबीत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व बांधीव गटाराचे मंजूर काम सद्यस्थितीत प्रगतीत असून या रस्त्याचे सर्व काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले असून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


          या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री विक्रम काळे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, महादेव जानकर आदींनी सहभाग घेतला. 


0000

अंजनगाव सूर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचेकाम लवकरच पूर्ण करणार

 अंजनगाव सूर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचेकाम लवकरच पूर्ण करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


              अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी उपस्थित केला होता. 


              मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम विहित वेळेत पूर्ण केले नसल्याने संबंधित कंत्राटदारांवर १ जानेवारी २०२३ पासून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि अंजनगाव सूर्जी शहरास सुरळीत पाणीपुरवठा होईल.


0

पारिजातकाचे/प्राजक्ता चेऔषधी उपयोग.*

 *पारिजातकाचे/प्राजक्ता चेऔषधी उपयोग.*



*खोकला थांबत नसेल तर, सालिचे चूर्ण करून ते १,२ ग्रँम मधातून घ्यावे बराहोतो.


*विषमज्वर, हाडिताप, मुरलेला ताप, मूदतीचा ताप हे सर्व ज्वराचे प्रकार काढा घेतल्यास समूळ नष्ट होतात.आणि तापात येणारि उलटि, मळमळ बंद होते.


*पारिजातकाच्या काढ्यात सुंठ, व मध घालून दोन वेळा घेतला तर तीव्र ताप उतरतो


*पोटातिल क्रुमि, जंत, काढा घेतल्यास मरून बाहेर पडतात.


* नाकातून, तोंडातून,कानातून, गुदद्वारातून,योनीमार्गात न रक्त येण्याचा त्रास असतो, तेव्हा प्राजक्ताचे मूळ स्वच्छ धुवून , चावावे, रक्त बंद होते.

* खाज, खरुज, दाद, नायटा, ईसब, या सर्व त्वचा विकारांवर पारिजातकाचि पेस्ट, लावावि, आराम पडतो. 

*पानांचा काढा करून नियमित घेतल्यास शुगर नियंत्रित राहते.

*सारखे युरिनला जावे लागत असेल तर यांचा काढा करून तो १०, १२ मि लि. घ्यावा.

*पारिजातकाच्या तेलाने मालिश केल्यास केस काळे राहुन मजबुत होतात.

*.बियांचि पेस्ट करून मोहरीच्या तेलात मिक्स करून डोक्याला लावल्यास टक्कल पडणे थांबते.



*गुडघेदुखि, सांधेदुखित, कोवळ्या पानांचा काढा करून तो तिन वेळा घ्यावा.

* काढा नियमितपणे घेतल्यास टाँन्सील बरे होतात.

*चरबी कमी होते


आता याचे फायदे जसे आहेत तसे अनेकांना ते त्रासदायक ही ठरू शकते पित्ताचा त्रास वारंवार होणाऱ्या मंडळी नी याचा वाट्याला जाऊच नये, गर्भवती महीला,स्तनदा मातांनी याच्या वाट्याला गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

जरी याचा त्रास काही लोकांना होणार असला तरीही अनेकांना हे त्रासापासून मुक्त करणारे रामबाण ठरू शकते तेव्हा आपल्या प्रकृतीला कितपत झेपतय हे पाहूनच कुठलेही उपाय स्वतः हून करण योग्य ठरेल.



*माहिती आवडली असेल तर शेअर करा 📲*




मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातमहिला सुरक्षा रक्षक नेमणार

 मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातमहिला सुरक्षा रक्षक नेमणार


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 25 : राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.


            बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी -सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार यास जबाबदार असलेल्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.


            राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षा आणि सोयीसुविधासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.


००००

Featured post

Lakshvedhi