राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू
- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई दि. 25 : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या (टेट) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.
यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम असा आहे, जाहिरात देण्याचा कालावधी 15/08/2023 ते 31/08/2023,उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे. 01/09/2023 ते 15/09/2023, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. 10/10/2023, मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे. दि. 11/10/2023 ते दि. 21/10/2023, पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे. दि. 21/10/2023 ते 24/10/2023 असे आहे.
तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना 7 जुलै 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.
या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment