Tuesday, 23 May 2023

महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठीसमीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार

 महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठीसमीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार


 


            मुंबई, दि. २३ : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व ‘समीर’ (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) यांच्यासोबत रेडिओलॉजी आणि रेडिओ थेरपी तंत्रज्ञानावर आधारित कर्करोगावर उपचार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.


          या सामंजस्य कराराच्या वेळी ‘महाप्रीत’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व समीर संस्थेच्या सुनीता वर्मा तसेच ‘महाप्रीत’ कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


         यावेळी श्री. श्रीमाळी म्हणाले की, “रेडिओथेरपी व रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होऊन उद्योग निर्मितीला चालना मिळेल व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात रोजगारनिर्मिती होईल.``


          श्रीमती वर्मा म्हणाल्या की, “या करारामुळे समीर (SAMEER) संस्थेमार्फत रेडिओलॉजी व रेडिओथेरपी संशोधन व तंत्रज्ञानाची कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मदत होईल. ‘महाप्रीत’तर्फे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यात येईल. या संशोधनामुळे महाराष्ट्रामध्ये अद्ययावत उपचार सुविधा निर्माण होतील.


            याप्रसंगी समीर संस्थेचे अधिकारी, महाप्रीत तसेच भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबईचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


                                                      

योगासने करताना घ्यावयाची काळजी व २४ नियम:*

 🧘🏻‍♀ 🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍


💁🏻 *योगासने करताना घ्यावयाची काळजी व २४ नियम:*


०१. यम व नियम यांच्या तत्त्वामुळे शीलसंवर्धनाचा मजबूत पाया घातला जातो. आसनक्रियेला यम व नियमांचा पाठिंबा नसेल तर तिला कसरतीचे स्वरूप येते.


०२. आसनांचा 🧘🏻‍♀ अभ्यास नियमितपणे करण्याची इच्छा असेल, तर शिस्त, चिकाटी, श्रद्धा हे गुण असणे आवश्यक आहेत.


०३. आसनांचा प्रारंभ करण्यापूर्वी, मूत्राशय आणि आतडी रिकामी असायला हवीत. शौचास जाऊन आल्यावर हा व्यायाम 🏋🏻‍♀ करावा. बद्धकोष्ठतेचा विकार असेल तर प्रारंभी शीर्षासन व सर्वांगासन करावे. इतर आसने शरीरशुद्धीनंतरच करावी.


०४. स्नानानंतर आसने करणे सोपे जाते. आसनांच्या व्यायामाने घाम येत असल्याने हा व्यायाम झाल्यावर १५-२० मिनिटांनी ⏰ पुन्हा स्नान करणे चांगले असते. आसनापूर्वी व आसनानंतर स्नान केल्याने शरीर व मनास ताजेपणा प्राप्त हातो. 


०५. योगासने करण्याची उत्तम वेळ म्हणजे पहाट. सकाळच्या 🌞 वेळा अंग ताठर बनलेले असते; तर पहाटेच्या वेळी मनाला ❤ ताजेपणा असतो; तल्लखपणा, निश्चयीपणा असतो. संध्याकाळच्या 🌆 वेळी सकाळपेक्षा शरीराच्या हालचाली अधिक मोकळेपणाने होतात. त्यामुळे आसने चांगली जमू शकतात व दिवसभराच्या कामाचा ताण व थकवा नाहीसा होतो.


०६. योगासने हवेशीर आणि स्वच्छ जागेत करावीत. चांगल्या सपाट जमिनीवर सतरंजी टाकून करावीत. डास, ढेकूण आदींचा त्रास 😣 अशा जागी नसावा.


०७. आसने शक्यतो पोट रिकामे असतानाच करावीत. आसने करण्यापूर्वी कपभर पेये, चहा ☕, कॉफी, दूध 🥛 ही घेतली तरी चालतात. नेहमीचे जेवण झाले असल्यास, भोजनानंतर ४-५ तास ⏱ तरी आसने करू नयेत.


०८. उन्हात बराच वेळ फिरल्यावर आसने करू नयेत.


०९. आसने करताना वाटल्यास आरसा जमिनीशी काटकोन करूनच ठेवावा.


१०. स्त्रियांनी 👭 मासिक पाळीच्या काळात आसने करू नयेत. आवश्यकतेप्रमाणे उपविष्ट कोणासन, बद्ध कोणासन, वीरासन, उत्तानासन ही आसने करणे हितकारक ठरते. आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शन घेऊन आसने करावीत. 


११. गरोदरपणाच्या 🤰🏻पहिल्या तीन महिन्यांमध्ये स्त्रियांनी सगळी आसने करण्यास हरकत नाही. 


१२. स्त्रियांनी प्रसूतीनंतरच्या 🤰🏻 पहिल्या महिन्यात आसने अजिबात करू नये. ❎


१३. वीर्यदोष असलेले लोक आसनांच्या अभ्यासाने पूर्ण निदोर्षी होऊ शकतात. त्यासाठी विवाहितांनी ऋतुरात्री ब्रह्मचर्याचे परिपालन करावे.


१४. आसनाचा व्यायाम अतिअल्प प्रमाणात करून, हळूहळू याच प्रमाण वाढवावे. शक्तीबाहेर अधिक व्यायाम करू नये. 


१५. आसने करण्यापूर्वी करतेवेळी, चांगल्या गोष्टींचे चांगल्या विचारांचे चिंतन विशेष रीतीने करणे चांगले होय.


१६. आपल्या प्रकृतीला मानवेल तसे थंड वा ऊन पाण्याने स्नान करावे.


१७. आसनांच्या अभ्यासाबरोबर सूर्यभेदन व्यायाम 🏋🏻‍♀ चालू ठेवायचा असल्यास, सूर्यभेदन व्यायाम करून नंतर आसनांचा अभ्यास करावा.


१८. आसनांचा अभ्यास करताना शक्यतो कोणतेही औषध 💊 घेऊ नये. अत्यावश्यक असल्यासच घ्यावे.


१९. रात्रीचे 🌠 जागरण व दूरवरचे वारंवार प्रवास यांतून शारीरिक

त्रास होणारे प्रसंग टाळावेत. 


२०. खाद्यपेये सात्त्विक असावीत. आंबट, तिखट, खमंग तळलेले पदार्थ फारसे खाऊ नयेत.


२१. दररोज ४ ते ५ आसने करावीत. आसने योग्य अशी निवडूनच घ्यावीत.


२२. आसने व इतर कोणताही मैदानी वा मर्दानी व्यायाम 🏋🚴 यात अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ ⏱ गेला असला पाहिजे.


 २३. आवश्यक आसनांचा अभ्यास दीर्घकाळ केल्यासच लाभ दिसू लागतो. तसेच एकेका आसनावर बसण्याचा काळ वाढविल्यासच त्याचा फायदा दिसून येतो.

 

२४. आपणास आवश्यक असणारे एखादे आसन जमत नसेल, तर ते आसन रोज आसने करण्यापूर्वी करून पाहावे व स्थिती साधावी.


( *संकलन:* आर्या देव) 


💁🏻‍♀ *रोगांचे खात्रीशीर निदान व उपचार यांसाठी वैद्य तुषार साखरे (आयुर्वेदाचार्य) यांना जरूर संपर्क करा.*


💁🏻‍♀ *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा. 🤗*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातूनगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य

 मुख्यमंत्री  सहायता निधी कक्षातूनगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य


- विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे


 


            मुंबई, दि. 22 : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.


            राज्य शासनामार्फत जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कशा प्रकारे लाभ दिला जातो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी श्री. चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 23, बुधवार दि. 24 आणि गुरूवार दि. 25 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

पुस्तकांचे गाव ‘भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव

 पुस्तकांचे गाव ‘भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव


- राज्यपाल रमेश बैस


            सातारा दि. 22 : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.


                   महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


      पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळी-वेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


                 यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकांचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.


००००

जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे

 जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे


- मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि. 22 : जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्य शासन आणि एफ सी बायर्न, महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टीव्ही 9 यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 14 वर्षाखालील फुटबॉल खेळाडू जर्मनीत गेले आहेत. या खेळाडूंनी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.


            जर्मनीत निवड होवून प्रशिक्षणासाठी आलेल्या फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, क्रीडा उप सचिव सुनील हंजे तसेच एफसी बायर्न क्लबचे भारतातील प्रतिनिधी कौशिक मौलिक आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ राज्यात रुजावा. राज्यातील खेळाडूंना या खेळामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य शासनाचा क्रीडा विभाग व एफसी बायर्न म्युनिक फुटबॉल क्लब, जर्मनी यांच्यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र करंडक नावाने 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राज्यातील जवळपास 1 लाख मुलांनी सहभाग घेतला.


            म्युनिक - जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी, एफसी बायर्न फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट 20 फुटबॉलपटूंची निवड केली. जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे दि. 19 ते 26 मे 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.


            राज्यात फुटबॉल खेळास चालना मिळावी, तसेच राज्यातील खेळाडूंना या खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य तंत्र आत्मसात करता यावे व प्रशिक्षण मिळावे आदी बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे शिष्टमंडळ जर्मनी येथे गेले आहे. हे शिष्टमंडळ म्युनिक येथे गेले असता या खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणारे इंटरनॅशनल यूथ एक्सचेंज फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मीरजम एसिले, वरिष्ठ सल्लागार पीटर लीबल, युवा प्रशिक्षक डॅनिअल व ॲलेक्स यांचा राज्य शासनाच्यावतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते स्‍मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्तानेपर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज

 आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्तानेपर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज


- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव


            मुंबई, दि. 22 : आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.


            मुंबईत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


            यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या सचिव लीना नंदन, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष सी. अचलेंद्र रेड्डी, केंद्र आणि राज्य शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले, आपण नेहमी पर्यावरणातून सर्वोत्तम गोष्टी उचलतो आणि कचरा परत देतो, विकासाबरोबरच आपला वापर देखील वाढला आहे.


            जर आपण अनावश्यक वापराला प्रोत्साहन देत राहिलो तर एक पृथ्वी देखील पुरणार नाही. आगामी काळात विकासाबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी मिशन लाइफअंतर्गत प्रत्येक गावात जैवविविधता नोंद पुस्‍तक तयार करण्याची कल्पना मांडली.


            महाराष्ट्र शासनाच्या अनोख्या ‘जीन’ बँक उपक्रमाचे अभिनंदन करून मंत्री श्री यादव म्हणाले की, “महाराष्ट्रात वसलेला पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने, 48 वन्यजीव अभयारण्ये आणि तीन रामसर स्थळे आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यासाठी यापेक्षा उत्तम जागा असूच शकत नाही.”


            या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेबद्दल बोलताना मंत्री श्री. यादव म्हणाले, पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मिशन लाइफ (LiFE) बरोबर जोडण्याची मंत्रालयाची योजना आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. मिशन लाईफ अंतर्गत, ‘संपूर्ण समाज’ हा दृष्टिकोन अंगीकरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे श्री. यादव म्हणाले.


            भरड धान्यांचे महत्व सांगताना केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले की, “भरड धान्ये ‘व्होकल फॉर लोकल’ च्या भावनेला चालना देतात. हे पीक भारतीय हवामान आणि मातीसाठी अनुकूल आहे. दुष्काळ प्रतिरोधक असण्याबरोबरच, भरड धान्ये पोषणाची कमतरता कमी करण्यासाठी महत्त्वाची आहेत. जैवविविधता मंडळाने भरड धान्यांना विशेष महत्व दिले आहे. असुरक्षित समुदायाला सहज उपलब्धता आणि लाभ मिळावा, हे याचे उद्दिष्ट आहे.” 


            पर्यावरण रक्षण हा देशासाठी श्रद्धेचा विषय असल्याचा मंत्री श्री. यादव यांनी पुनरुच्चार केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आपल्या आधीच्या पिढीने संरक्षण केल्यामुळे आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे”.


            यावेळी पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, “जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर त्या बदल्यात पर्यावरण आपले रक्षण करेल. आपण पर्यावरणाकडून जेवढे घेतो तेवढे परत दिले नाही तर निसर्गाचा समतोल बिघडेल आणि आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. निसर्ग जगला, तर आपण जगू आणि पृथ्वी जगेल.”


            भरड धान्यांचा संदर्भ देत मंत्री श्री. चौबे पुढे म्हणाले की, “भारताच्या पुढाकारामुळे आज संपूर्ण जग भरड धान्याकडे आकर्षित झाले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून आपल्याला भरड धान्य विषयीचे ज्ञान, मागणी आणि पुरवठा वाढवायचा आहे. आपण एक लोकचळवळ निर्माण करून भरड धान्य विषयीचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवे.” यावेळी मंत्र्यांनी ‘निसर्ग, संस्कृती आणि साहित्याला उज्वल भविष्याकडे नेण्याचा मंत्र दिला.


            पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन म्हणाल्या की, आपले जीवन मुख्यत्वे जैवविविधतेवर अवलंबून आहे हे आजच्या दिवशी आपण मान्य करतो.


            राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या ‘जैवविविधता हेरिटेज साइट्स ऑफ इंडिया’ आणि ‘अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड मॅनेजमेंट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.


            केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भरड धान्यावर आधारित विशेष लक्ष केंद्रित करून भरवण्यात आलेल्या जैवविविधता प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प, भारतीय वनस्पती सर्वेक्षण आणि इतर अशा विविध संस्थांचे कार्य प्रदर्शित करण्यात आले. भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी असलेल्या विविध सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी देखील या प्रदर्शनाचा सहभाग घेतला होता.


००००


वृत्त 

ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा, आवश्यक सुविधा देणार

 'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा, आवश्यक सुविधा देणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत


राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक


            मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून 'ईएसआयसी' (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील 'ओएनजीसी' संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव आरती आहुजा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. श्रम प्रतिष्ठेला महत्व देण्यात येत आहे. कामगार क्षेत्रासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ई-श्रम पोर्टल यामध्ये अत्यंत महत्वाचे ठरत आहे. या नोंदणीमुळे कामगार विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण व समन्वय साधून कामगारांना लाभ देण्यावर भर देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


'ई-श्रम कार्ड'साठी शिबीर आयोजित करावेत - केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव


            केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत महत्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर आयोजित करावेत. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.


            कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावेळी नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचेसोबत त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


‘ई-श्रम’ कार्ड


            केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होत आहे.

Featured post

Lakshvedhi