Tuesday, 16 May 2023

-20 उर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू

 जी-20 उर्जा संक्रमण कार्य गटाची बैठक आजपासून मुंबईत सुरू


हवामान बदलाचा सामना आणि ऊर्जा सुरक्षेच्या हमीसाठीअपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करावा

- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे

            मुंबई, 15 :- भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील तिसरी उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी-20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA), आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.


            तिसऱ्या उर्जा संक्रमण कार्य गट (ETWG) बैठकीच्या पहिल्या दिवशी, भारत सरकारचे रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या विशेष संबोधनात शाश्वत ऊर्जा स्रोत आणि त्यांचे संवर्धन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या धोरणांचा विकास आणि अवलंब करण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला. “शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी जी-20 राष्ट्रांवर एक अद्वितीय जबाबदारी आहे.” असेही श्री. दानवे म्हणाले.


            या दृष्टीने या अशा प्रकारच्या ऊर्जा संक्रमणाबाबत (उर्जास्रोतांच्या वापरातील बदल) भारत आघाडीवर असून जगात करत असलेले नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे, धोरणे आखणे आणि नियमन करणे याबाबत सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निधी पुरवठा आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यात वित्तीय संस्था सुद्धा महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. उद्योग जगत, दीर्घकाळ चालू शकणाऱ्या पद्धती राबवून अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात गुंतवणूक करू शकते. एकापेक्षा जास्त सदस्य राष्ट्र असलेल्या जागतिक संघटना विकसनशील राष्ट्रांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवू शकतात आणि सर्वात शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे, नागरिकही त्यांच्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून या चळवळीचा एक भाग बनू शकतात, असे काही उपायही रावसाहेब पाटील दानवे यांनी या बैठकीत आपले विचार मांडताना सुचवले.


            ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आणि ईटीडब्लूजीचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला आणि खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे देखील या बैठकीत आणि विचारविनिमयामध्ये सहभागी होते. 


            तिसऱ्या ईटीडब्लूजी बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली.


            या बैठकीच्या निमित्ताने तीन इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये धोरणकर्ते, बहुस्तरीय संघटना, वित्तीय संस्था, व्यापारी संघटना आणि विषयतज्ञ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी या इतर कार्यक्रमांमध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता.


            कमी खर्चाचे आंतरराष्ट्रीय अर्थसाहाय्य मिळवण्याच्या उद्देशाने बहुस्तरीय विकास बँकांसोबत कार्यशाळा– बॅटरी, साठवणूक, हरित हायड्रोजन, किनारपट्टीवरील वारे, जैवऊर्जा आणि कार्बन कॅप्चर युटीलायजेशन यांसारख्या उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी देशांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे सुनिश्चित करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.


            न्याय्य संक्रमण आराखड्यावर परिसंवाद – कोळसा क्षेत्रातील संक्रमणासमोर, प्राथमिकतेने कोळशावर आधारित अर्थव्यवस्थांसमोर असलेल्या आव्हानांबाबत परिसंवादात चर्चा करण्यात आली. संस्थामक शासन, भूमी आणि पायाभूत सुविधा मालमत्ता यांचा इतर कारणांसाठी वापर, जागतिक स्तरावरील यशस्वी उपक्रमांमधील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञानात्मक आणि आर्थिक साहाय्य यावर भर देण्यात आला.  


            जैवइंधनावर परिसंवाद - जागतिक जैवइंधन आघाडी तयार करण्यासह जैवइंधनासंदर्भात सहकार्यविषयक आघाडी बळकट करण्याच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानासह जैवइंधनाचा विकास आणि वापर अधिक गतीने करण्याच्या उपाययोजनांवर या परिसंवादात चर्चा झाली.


या मंत्रिस्तरीय परिपत्रकाच्या मसुद्यावरील चर्चा आणि प्रगती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहील. 17 मे 2023 रोजी या तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा समारोप होणार आहे. सदस्य देशांमधील करार आणि सहमती स्वच्छ ऊर्जा संक्रमणाबाबत जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी सहाय्यकारक ठरण्याची अपेक्षा आहे. 


०००



 


वृत्त क्र. 1554


दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी !


            नवी दिल्ली, 15 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.


            या कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2023 दिल्ली यांच्यावतीने करण्यात आले. विचारमंचावर लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे उपस्थित होते.


            मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहासकालीन अनेक पैलूंचा उलगडा केला. माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ - मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र - कोकण व दक्षिण भारत हे कार्यक्षेत्र कसे होते याबद्दल त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले, आमच्या समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असून राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुद्धा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.     


             प्रख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी लिहिलेले महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि त्यातून मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधून प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असून अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले. म्हणी वाक्यप्रचारातून त्यांनी आजच्या परिस्थितीवरही बोट ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.


            विजय काकडे, कमलेश पाटील, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांचीही प्रबोधनपर भाषणे झाली.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, शासनातर्फे साजरे करण्यात येणारे राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाच्या यादीमध्ये 14 मे हा दिवस छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणून समाविष्ठ केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करावी. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. 


            या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी आभार व्यक्त केले.


            कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सदन येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यासह या परिसरात असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदनाच्या आतील भागात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अर्धाकृती पुतळ्या

स पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


00000


परिक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यासकुलगुरुंना जबाबदार धरले जाईल

 परिक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यासकुलगुरुंना जबाबदार धरले जाईल


- राज्यपाल रमेश बैस


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या तयारीचा राज्यपालांकडून आढावा


            मुंबई, दि. १५ : विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहिर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत. विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहिर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले. 


            राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक सोमवारी (दि. १५) राजभवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. 


            आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विद्यापीठांशी निगडित सामायिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


            याच विषयावर राज्यातील उर्वरित विद्यापीठांची दुसरी बैठक नागपूर येथे घेणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 


            नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी उणापुरा एक दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने देशापुढे उदाहरण सादर करावे. वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे सामायिक शैक्षणिक वेळापत्रक चुकते. त्यामुळे निकाल वेळेवर लावले पाहिजे, तसेच गुणपत्रिकांचे देखील वितरण वेळेवर झाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. 


            अनेकदा इतर विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची किंवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने असे विद्यार्थी आपणास निवेदन लिहितात. विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पहावे.     


            काही दिवसांपूर्वी २०० विद्यार्थ्यांना एका विषयात चुकून शून्य गुण मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अशा चुका टाळल्या पाहिजे व चूक झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरित दिलासा दिला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.   


            बैठकीच्या सुरुवातीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आढावा सादर केला. तसेच १८ उद्दिष्ट पूर्तीबाबत (कि रिझल्ट एरियाज) अद्ययावत माहिती दिली.


            कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी देखील आपल्या विभागांशी संबंधित माहिती दिली. विद्यापीठांच्या कुलगुरुंनी धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपल्या विद्यापीठाच्या तयारीची माहिती दिली. 


            यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ कारभारी काळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि) माधुरी कानिटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय सावंत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रजनीश कामत आदी उपस्थित होते.   


००००


 


 


Governor reviews implementation of NEP in meeting of VCs


VCs will be held responsible for delay in declaration of results


- Governor Ramesh Bais


            Mumbai Dated 15 : Maharashtra Governor Ramesh Bais today advised vice chancellors of state universities to declare the results of various examinations within the stipulated time limit of 45 days. Noting that the future of students is directly linked to the declaration of results, the Governor cautioned that vice chancellors will be held accountable for the delay in declaration of results and dispensation of marksheets.


            The Governor was addressing the meeting of Vice Chancellors of traditional, agricultural, health sciences, technological and open universities at Raj Bhavan Mumbai. The meeting was organised to review the progress of the implementation of the National Education Policy 2020 from the forthcoming academic year 2023-2024.


            Stating that less than 2 months are left for the beginning of the new academic year, the Governor expressed the hope that Maharashtra would set for the nation the example of the model implementation of the National Education Policy.


            Principal Secretary Higher and Technical Education Vikas Chandra Rastogi presented a review of the implementation of the National Education Policy in the State and the progress made in respect of the 18 identified Key Result Areas. Principal Secretary Agriculture Eknath Dawale and Commissioner of Medical Education Rajeev Nivatkar were also present.


            Vice Chancellors / Acting Vice Chancellors of University of Mumbai, SNDT Women's University, Savitribai Phule Pune University, Shivaji University, Ahilyadevi Holkar Solapur University, Maharashtra University of Health Sciences, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapith, Dr Babasaheb Ambedkar Marathwada University, Dr Babasaheb Ambedkar Technological University and Dr Homi Bhabha State University were present.


0000



 

अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे

 अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन


 


            मुंबई, दि.१५ - अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


            अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलीनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देवून पाहणी केली आहे.


            जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


            कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नये, समाज माध्यमांवर कोणतीही पोस्ट टाकताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाकावी, आपण केलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.


०००००

आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याने आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

 *आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करण्याने आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात !!* 


तेल वारंवार गरम केल्याने त्यात फ्री रॅडीकल्स निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि त्यामधले अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तेलाच्या पुनर्वापरामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.


चला तर जाणून घेऊ तेलाच्या पुनर्वापराचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.


रोजच्या खाण्यामध्ये नियमित खाण्यात येणार पदार्थ म्हणजे तेल. जवळपास सर्वच घरात पुरी, भजी, तळण हे जेवणामध्ये खाल्लेच जाते. त्याचबरोबर पुरी, भजी, तळण तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल देखील अनेक जण पुन्हा दुसरा पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण तुम्हाला हे माहित आहे का? कि हे एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणं आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते ?


*नाही ?, तर जाणून घ्या.* 


तेल वारंवार गरम केल्याने त्यात फ्री रॅडीकल्स निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि त्यामधले अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तेलाच्या पुनर्वापरामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. चला तर जाणून घेऊ तेलाच्या पुनर्वापराचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते.


जर तुम्ही एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरत असाल तर त्याने कॅंसरचा धोका वाढू शकतो. तेल सतत गरम केल्याने त्यातील अँटी-ऑक्सिडेन्ट नष्ट होतात आणि फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. त्याने यामध्ये कॅंसर उत्पन्न करणारे घटक वाढतात. आणि हे घटक अन्नाद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे पोटाचा कॅंसर, पित्ताशयाचा कॅंसर, यकृताचा कॅंसर इत्यादी रोगांचा धोका वाढू शकतो .


वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्याने हृदयविकाराची समस्याही उद्भवू शकते. एकदा वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. वापरलेले तेल पुन्हा जास्त आचेवर गरम केल्याने त्यातील फॅट्स ट्रान्स फॅट्समध्ये रूपांतरित होते, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा तेलाचा वापर केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते.


वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर केल्यास पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने, अल्सर, ॲसिडिटी, जळजळ असे अनेक त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर तेलाच्या पुनर्वापरामुळे पचनासही त्रास होतो. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यांसारख्या समस्याही उद्भवतात.


एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने चरबी वाढून लठ्ठपणाही वाढू शकतो. त्याचबरोबर वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करून तयार केलेले अन्न सेवन केले तर मधुमेहाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वापरलेले तेल पुन्हा वापरणे शक्यतो टाळावे.


उच्च रक्तदाब असेल तरी तेलाचा पुनर्वापर करणे टाळावे. आधीच वापरलेले तेल पुन्हा वापरल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रॅडिकल्समुळे, रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



उच्चरक्तदाबावर प्रभाविउपाय...👇*

 *उच्चरक्तदाबावर प्रभाविउपाय...👇*


  १) अर्जुनारिष्ट काढा रोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर दोन वेळा घ्या

२) मुक्तावटि गोळी रोज दोन वेळा घ्या जेवणानंतर

३) अश्वगंधा चूर्ण रोज कपभर दुधात उकळून घ्यावे एक चमचा भरून

४) लसूण पाकळ्या तूपात परतवून रोज रिकाम्या पोटी सकाळी दोन पाण्यासोबत घ्या

५) दुधिभोपळा रस काढून रोज ब्रेकफास्ट च्या वेळि घ्या

६) ओवा व जवस भाजून याचि पूड करून रोज जेवणानंतर एक चमचा भरून घ्या

७) रोज दुपारी एक डाळिंब किंवा डाळिंबाचा रस काढून घ्यावा

८) रोज प्राणायाम व अनुलोम करावा..

९) रोज. ओंम. याचा उच्चार वीस वेळा करावा


... वरील उपाय केल्यास नक्कीच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील...



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनीअनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे

 अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनीअनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन.



            मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर- शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.  


            अनुसूचित जातीतील मांग/ मातंग/मिनी,मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/मदारी/राधेमांग/मांग गारुडी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांनी उद्योग/व्यवसाय करण्यासाठी महामंडळाच्या २० कलमी कार्यक्रमानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ३० व मुंबई शहर जिल्हा कार्यालयाकरिता अनुदान योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्ट ५०, बीजभांडवल योजनेतंर्गत भौतिक उद्दिष्ट ३० चे प्राप्त असून अर्ज करण्यासाठी जिल्हा कार्यालय, मुंबई उपनगर शहर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.


            अर्जदार मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय १८ ते ५० वर्ष असावे, यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.३ लाखांपेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल,अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षित असावा. अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र/करारपत्रे/कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर, उपनगर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

पश्चिम क्षेत्रातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखणार

 पश्चिम क्षेत्रातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखणार

- सुधीर मुनगंटीवार


            उदयपूर, दि. 15: पश्चिम क्षेत्रातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लुप्त होणाऱ्या कला कौशल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. यासाठी पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांतून त्या त्या राज्यातील लुप्त होत चाललेल्या कला कौशल्यांचे दस्तावैजीकरण करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र देशात अव्वल क्रमांकावर राहावे यासाठीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत अनेक उपयुक्त सूचना केल्या आहेत.


            शनिवारी उदयपूर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची वार्षिक नियोजनाची बैठक झाली. या बैठकीला प.क्षे.सां.केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता, संतोष जोशी, अशोक परब, प्रा.युगांक नाईक उपस्थित होते. तर राज्याचे सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह इतर सदस्य राज्यातील शासकीय अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


            यावेळी बोलतांना मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमांसाठी व योजनांसाठी सीएसआर मधून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सीएसआर निधीमुळे यापुढे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजनांना निधीची कमतरता जाणवणार नाही, असे ते म्हणाले.


सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञान विकिपेडियावर आणणार


            पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांकडे मोठा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक ज्ञानाचा खजिना असून या सांस्कृतिक वारशाची तसेच पारंपरिक ज्ञान व साहित्याची माहिती विकिपेडीयावर नवीन पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या. यासंदर्भात विकिपेडियाचे जागतिक संचालक होरे वर्गीस आणि त्यांच्या चमूने या बैठकीसमोर सादरीकरण केले.


कलाकारांचे मानधन वाढविण्याचा प्रयत्न


            पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राशी संबंधित योजना आणि कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कलाकारांचे मानधन अनेक वर्षे वाढवले गेलेले नाही. हे मानधन काळानुरूप वाढविण्यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक खात्याला शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.


देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राशी समन्वय निर्माण करणार


            देशातील विविध भागात असलेल्या विविधतेतही सांस्कृतिक एकता विद्यमान आहे. त्यामुळेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचे आयोजन करताना देशातील इतर क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांशी सांस्कृतिक कार्य विषयात योग्य तो समन्वय साधला जावा असे श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले.


गेटवे ऑफ इंडिया येथे दर सप्ताहात होणार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


            भारतात येणारे परदेशी पर्यटक तसेच देशांतर्गत पर्यटक मोठ्या प्रमाणात गेटवे ऑफ इंडिया येथे भेट देत असतात. त्यांच्यासमोर पश्चिम क्षेत्रातील चार राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण केल्यास या भागातील कला कौशल्यांच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर पोहोचविणे सोपे जाईल, असे मत श्री. मुनगंटीवार यांनी मांडले. त्याला समिती सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार गेटवे ऑफ इंडिया येथे दर आठवड्यात शनिवार, रविवारी सहा सदस्य राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची कायमस्वरूपी योजना आखण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री.खारगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे इतर अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य त्यांना मदत करतील.


पंढरपूर येथे होणार भक्तीसंस्कृती संमेलन


            राज्यातील वारकरी संप्रदाय आणि भक्तीसंस्कृतीची माहिती देशातील इतर राज्यांना व्हावी याकरिता पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे कार्तिकी वारीच्या काळात पंढरपुरात राष्ट्रीय भक्तीसंस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे या कामात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला मदत करणार आहेत.


नागपूर येथे व्याघ्र परिषद


            पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यातील व्याघ्र प्रकल्प, त्यातील गावे, तेथील निसर्गप्रेमी संस्कृती यांची माहिती जगाला करून देण्यासाठी नागपूर येथे व्याघ्र परिषद घेण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे स्वतःचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक गीत तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेतला गेला.


पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांचे संमेलन


            पश्चिम क्षेत्रातील भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे संमेलन आयोजित करण्याच्या सूचना श्री.मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. या संमेलनात केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांसह पश्चिम क्षेत्रातील सर्व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे. या संमेलनात पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांसोबत थेट चर्चा करून सांस्कृतिक क्षेत्रासंबंधी त्यांच्या सूचना समजून घेतल्या जातील.


प्रत्येक राज्याच्या नावावर किमान एक गिनीज जागतिक विक्रम असावा


            पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सदस्य राज्यांपैकी प्रत्येक राज्याच्या नावाने सांस्कृतिक क्षेत्रातील एक गिनीज जागतिक विक्रम असला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.पश्चिम क्षेत्रातील प्रत्येक राज्याला चांगला ऐतिहासिक वारसा असून त्यातील गड किल्ल्यांशी अनेक ऐतिहासिक कथा जोडल्या आहेत. त्या कथांसह या गडकिल्ल्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी म्हणून विशेष योजना आखण्याचे निर्देश श्री मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची पुढील बैठक मुंबईत जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही श्री. मुनगंटीवार यांनी केली.

Featured post

Lakshvedhi