Tuesday, 7 February 2023

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना.

 जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर

तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना.

            मुंबई, दि. 6 : स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या.


            विभाग आणि जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या कामकाजासंदर्भातील ऑनलाईन आढावा बैठक मुख्य सचिव श्री.श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बैठकीस उपस्थित होते.


            नागरिकांना मंत्रालयापर्यंत न येता स्थानिक पातळीवरच सुलभरित्या आपले म्हणणे,अडचणी मांडता याव्यात, यासाठी विभागीय आणि जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याठिकाणी गतिमान कार्यपद्धतीचा वापर करुन प्राधान्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे मुख्य सचिवांनी निर्देशित केले. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कक्षाकडे प्राप्त अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्यासाठी यंत्रणांवर, क्षेत्रीय कार्यालयांवर नियंत्रण ठेवावे. लोकांचा शासन,प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या व्यापक जाणीवेतून प्राप्त प्रत्येक अर्ज,निवेदन तातडीने निकाली काढण्यात यावे. ई ऑफीसच्या माध्यमातून हे काम अधिक गतिमानतेने करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी सेतू केंद्राच्या माध्यमातून पूरक व्यवस्था,आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता ठेवावी. प्राप्त अर्जांचे लगेच वर्गीकरण करुन जिल्हास्तरावरील अर्जांवर कार्यवाही सुरु करुन राज्यस्तरावरील अर्ज मंत्रालयात वर्ग करण्यात यावेत. अर्धन्यायिक प्रकरणांशी निगडीत अर्जांबाबत योग्य ती पाहणी करुन अर्जदारास योग्य ते मार्गदर्शन करावे. शासकीय कर्मचा-यांची सेवा विषयक प्रकरणे या कक्षाच्या अखत्यारित येत नसल्याने, विहीत पद्धतीने संबंधित यंत्रणेकडे अर्ज करण्याबाबत अर्जदाराला अवगत करावे.


            मुख्यमंत्री महोदयांना जिल्हा दौ-यात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने तातडीने वर्गीकृत करुन राज्यस्तरावरील विषय मंत्रालयाकडे हस्तांतरित करावेत तसेच जिल्हा, विभागीय विषयावरील अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे.  


            स्थानिक पातळीवरच आपल्या समस्या सोडवल्या जातात, हा विश्वास नागरिकांना या कक्षामुळे मिळाल्याने मंत्रालयात मोठ्या संख्येने राज्यभरातून येणाऱ्या अर्जांची संख्या नियंत्रणात राहील, त्याचसोबत अतिमहत्वाच्या विषयांवरील अर्ज तातडीने निकाली काढणे शक्य होईल, या दृष्टीने जिल्ह्यात, विभागात प्राप्त प्रकरणे विनाविलंब निकाली काढल्या जात असल्याची खबरदारी विभागीय आयुक्तांनी, जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. तसेच स्थानिक पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची गुणवत्ता आणि कालमर्यादा याचा संबंधित विभागाच्या सचिवांनी, पालक सचिवांनी वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना श्री. श्रीवास्तव यांनी यावेळी दिल्या.


            लोकाभिमुख प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी नियमितपणे अभ्यागतांसाठी ठराविक वेळ ठेवावी, त्याबाबत आपल्या दालनाच्या बाहेर वेळ निर्देशित करावी, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांनी देखील आपल्याकडे येणाऱ्या अभ्यागतांना आर्वजून भेटावे. नागरिकांना विनासायास सुलभरित्या सेवा, योजनांचा लाभ उपलब्ध होईल यादृष्टीने ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देत यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.


००००

या वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार

 या वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 6 :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


            शालेय शिक्षण तसेच मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी मंत्री श्री. केसरकर यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला.


            शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना श्री.केसरकर म्हणाले, 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना 16 हजार रूपये, माध्यमिक वर्गात 18 हजार रूपये तर उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना 20 हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येईल. हे मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येत आहे.


            शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये, पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी (केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती) यांना आठ हजार रूपये मानधन मिळेल.


            मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार असून मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत. त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले.


            नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगून इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे श्रेणी देता येईल का याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.केसरकर यावेळी म्हणाले.


           माता रमाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुंबईत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त चेंबूर येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेच्या वसतिगृहास माता रमाईंचे नाव देण्यात येणार असून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याची तसेच शाळांमधून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


00000

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार

 आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार

- पालकमंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. 6 : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.


            रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितिन करीर, प्रधान सचिव पराग जैन, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आंबा बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे आदी पदाधिकारी, नाम फाऊंडेशनचे मंदार पाटेकर, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.  


            मंत्री श्री. सामंत म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंबा व काजू बागायतदार नुकसानग्रस्तांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यासंबंधी व कर्जदारांचे कर्ज पुनर्गठीत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित अधिकारी यांची 9 फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांची शेतकऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले.


            यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांना 84 कोटी रुपयांचा पीक विम्याचा मोबदला देण्यात आला आहे. याबाबत खातरजमा करुन उर्वरित वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून प्रश्न सोडवावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळाला त्यांची यादी जाहीर करण्याचे निर्देश श्री. सांमत यांनी दिले.


            आंबा बागायतदारांना पेट्रोल, रॉकेल, खते, कीटकनाशके आणि औषधांच्या निर्धारित किमतीसंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. रत्नागिरीत सुसज्ज प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करुन प्रयोगशाळा सुरु करण्यात येईल. फळमाशी व माकड अशा वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीबाबत राज्य शासनाने समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा जिल्हा दौरा होणार असून या समितीने सूचविलेल्या उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येईल. शेतीसाठी वापरात असलेल्या कृषीपंपांना चुकीची वीज बिले आकारली जात असल्याबाबतच्या समस्येची माहिती घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रश्न सोडवावा, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.


कुळवहिवाट प्रकरणांसाठी मोहीम राबवावी


            कोकणातील कुळवहिवाटदारांची प्रकरणे व दावे तसेच पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या घरांच्या जमीन मालकी हक्कासंबंधी गावनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन मोहीम राबवावी. रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांना जातीचे दाखले देण्यासंबंधी जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन निर्णय घेतला जाईल. तसेच सारथी मध्ये तिल्लोरी – कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतही विचार केला जाईल.


            रत्नागिरीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘लोकनेते शामरावजी पेजे अभियांत्रिकी विद्यालय’ असे नाव देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. तसेच लोकनेते शामरावजी पेजे आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबीबहुल तालुक्यांमध्ये सांस्कृतिक कुणबी भवन उभारण्यासाठी योजना राबविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.    


 नदीतील गाळ काढण्यावाशिष्ठीचे काम सुरू


            यावेळी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम तत्काळ सुरू करावे. वाशिष्ठी नदीतील गाळाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            पहिल्या टप्प्यातील शिल्लक रक्कमेतून सध्या गाळ काढण्याचे काम करावे तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


००००

छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे

 छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे

क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण.

            मुंबई, दि. 06 : छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकरचे ( मस्कॉट) आज क्रीडा मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंत्री महोदयांचे शासकीय निवासस्थान सेवा सदन येथे अनावरण झाले.


            यावेळी आमदार भरत गोगावले, हिरामण खोसकर यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी तथा जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईन शेख, सचिव दत्ता सोमवंशी लातूर येथून, तर मुंबई येथून महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


            छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे. जिल्ह्यातील युवक, शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन लातूर येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेला महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करावे. स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.


            जिल्ह्यात 2012 नंतर प्रथमच मोठ्या स्वरुपाची स्पर्धा होत असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.


            लातूर जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईन शेख यांनी क्रीडामंत्री तथा पालकमंत्री श्री. महाजन यांचे आभार मानले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


            छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा उपसंचालक श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले. मैदान, निवास आणि भोजन व्यवस्था, तसेच या अनुषंगाने विविध समित्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी याविषयी माहिती त्यांनी यावेळी दिली.


0000

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य

 भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 6 : मंगेशकर कुटुंबियांनी संगीताची सेवा करून सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. या कुटुंबातील भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे अलौकिक देणं आहे. त्यांच्या स्मृतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


            आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यातर्फे आज सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात 'लतांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, खासदार तथा अभिनेत्री हेमामालिनी, संगीतकार श्री. प्यारेलाल शर्मा, सौ. शर्मा, श्री. आनंदजी, अभिनेत्री मौसमी चटर्जी, रीना रॉय, पद्ममिनी कोल्हापुरे, काजोल, रविना टंडन, गायक सुरेश वाडकर, गायिका साधना सरगम, बेला शेंडे, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढणार आहे. त्यामुळे या संगीत महाविद्यालयास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. लता मंगेशकर यांच्या आवाजाने भौगोलिक सीमा ओलांडून नागरिकांचे भावविश्व व्यापले. त्यांचा आवाज प्रत्येक घरात लहानापासून ते मोठ्यापर्यंत ऐकला जातो. गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्यापासून नवोदित गायक, कलावंतांना प्रेरणा मिळाली. मीरा भाईंदर येथे लता मंगेशकर यांच्या नावाने एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारण्यात येत आहे, त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार, आदिनाथ मंगेशकर यांच्यासह अभिनेत्री आशा पारेख, खासदार हेमामालिनी, संगीतकार श्री. प्यारेलाल, अभिनेत्री मोसमी चटर्जी, रिना रॉय, रविना टंडन, काजोल यांनी लता मंगेशकर यांच्या विविध आठवणी सांगितल्या.


            यावेळी गायिका साधना सरगम, बेला शेंडे, संपदा गोस्वामी, शरयू दाते, निरुपमा डे आदींनी लता मंगेशकर यांची अजरामर गीते सादर केली. यावेळी लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.


०००००

जिन्दगी कैसी है paheli

 Luck is not in your hands, but decision is in your hand.


Your decision can make luck, but luck can't make your decision.


So always trust yourself!

Good Morning

 *जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..*

*.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते*

*कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*

 ________❤️_______

         *शुभ सकाळ*

Monday, 6 February 2023

दिलखुलास' कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत.

 दिलखुलास' कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ

डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूजऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 7, बुधवार दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            वंध्यत्व काय आहे, यावर असणारी प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती डॉ. सावनकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Featured post

Lakshvedhi