Tuesday, 7 February 2023

छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे

 छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे

क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण.

            मुंबई, दि. 06 : छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह आणि शुभंकरचे ( मस्कॉट) आज क्रीडा मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंत्री महोदयांचे शासकीय निवासस्थान सेवा सदन येथे अनावरण झाले.


            यावेळी आमदार भरत गोगावले, हिरामण खोसकर यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी तथा जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईन शेख, सचिव दत्ता सोमवंशी लातूर येथून, तर मुंबई येथून महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


            छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे प्रथमच लातूर येथे आयोजन होत आहे. जिल्ह्यातील युवक, शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन लातूर येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेला महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करावे. स्पर्धेसाठी येणारे खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना क्रीडा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या. तसेच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.


            जिल्ह्यात 2012 नंतर प्रथमच मोठ्या स्वरुपाची स्पर्धा होत असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.


            लातूर जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिल्याबद्दल जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईन शेख यांनी क्रीडामंत्री तथा पालकमंत्री श्री. महाजन यांचे आभार मानले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


            छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा उपसंचालक श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले. मैदान, निवास आणि भोजन व्यवस्था, तसेच या अनुषंगाने विविध समित्यांवर सोपविण्यात आलेली जबाबदारी याविषयी माहिती त्यांनी यावेळी दिली.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi