Thursday, 19 January 2023

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार

 कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई दि. 18 : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आगामी काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आयोजिजत करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे वास्तुरचनाकार इंद्रजीत नागेशकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोयीसुविधा निर्माण करताना त्या आधुनिक काळाशी सुसंगत असतील तसेच या कामांची गुणवत्ता टिकून राहील याकडे लक्ष देण्यात यावे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना कोल्हापूर चित्रनगरीच्या अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील नियोजन करुन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबरोबरच आवश्यक त्या निविदा काढण्याबाबत सूचना देण्यात दिल्या. तसेच महाराष्ट्रातील संतांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्यावर मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असल्यास मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी जी सूट देण्यात येते तीच इतर भाषांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना देण्याबाबत विचार करता येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            कोल्हापूर चित्रनगरी येथे रेल्वे स्थानकाचा कायमस्वरूपी चित्रीकरण सेट तयार करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहरी बाजू आणि दुसरीकडे ग्रामीण बाजू तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे यासाठी एक स्पर्धा घेऊन संकल्पना चित्र अंतिम करावे, अशा सूचनाही यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. या बैठकीत सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे, बाह्य स्तोत्राद्वारे सुरक्षारक्षक पुरविणे, कर्मचारी पुरविणे, कोल्हापूर चित्रनगरीत आवश्यक तेथे पथदिवे लावणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.


००००

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण 23 जानेवारीला

 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण 23 जानेवारीला

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर.

            मुंबई, दि. १८ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवार, दि. २३ जानेवारी २०२३ रोजी विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.


            तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


            अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची ओळख व्हावी त्यानुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तैलचित्राचे अनावरण लवकरात लवकर करावे असे निवेदन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्या निवेदनानुसार अध्यक्षांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दि. 23 जानेवारी रोजी विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनावरण कार्यक्रमाला देशातील आणि राज्यातील मंत्र्यासह खासदार, आमदार आणि कला, क्रीडा, सिनेसृष्टी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी दिली.


०००


 



दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतर पाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.

 दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी पदाच्या मुलाखतीनंतरपाच तासांत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.

            मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ ते १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती पार पडल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या ५ तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसेच तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.


             आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out ) दिनांक २४ जानेवारी, २०२३ पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तद्नंतर अंतिम शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत

 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत

१६ जानेवारी २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णयाबाबत

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने केलेले स्पष्टीकरण

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या १६ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख झालेला होता. सदरचा उल्लेख यापूर्वीच्या शासन निर्णयांमध्ये असल्याने त्याची पुनरावृत्ती अनवधानाने या शासन निर्णयामध्येही झालेली होती. आता सदर शासन निर्णयामध्ये आवश्यक तो बदल करून शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे, असे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्पष्ट केले आहे.


००००

दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा

 दहिसर कांदळवन उद्यानाचा रस्ता सहा महिन्यात करावा

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. १९ : कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानाला पोहोचणारा रस्ता सहा महिन्यात करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.


            सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन उद्यानाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, मनपाचे कार्यकारी अभियंता (रस्ते) सु.बा. बाविस्कर, कार्यकारी अभियंता (विकास) रा.आ. जाधव, उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले, मानवी जीवनासाठी आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यासाठी कांदळवनाचे महत्व आहे. कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती जनतेला होण्यासाठी आणि त्यांच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे राहत आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. त्यातील गोराई कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे. दहिसर येथील कांदळवनला पोहोचणारा रस्ता तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने त्वरित आराखडा तयार करावा. नियमानुसार त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


0000

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचापरिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

 कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचापरिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. १९ : कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.


            कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिम गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक सरोज गवस आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाला प्राधान्य देत परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे सूचित करुन कर्नाळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अलिबाग येथील वन विभागाची मान्यता घेवून स्थलांतर करावे. कोणत्याही परवानग्या, मान्यता वन विभागाकडून प्रलंबित राहता कामा नये. कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.


            श्रीमती गवस यांनी यावेळी सादरीकरण केले. आराखड्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरूस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदींचा समावेश आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून १२ कि.मी. तर मुंबईपासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. १२.१०९४ चौ.कि.मी. क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्षांच्या १४७ प्रकारच्या जाती आहेत. हिवाळ्यात ३७ स्थलांतरीत पक्षी येथे पहावयास मिळतात. विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती येथे आहेत. ११ प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारचे सर्प, ५ प्रकारचे सरडे आणि बेडूक, १० प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या ५६ प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत. या सर्वांचे जतन करून निसर्ग पर्यटन आराखडा अंतिम करावा.


००००



 



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत.

            मुंबई, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.


            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उद्घाटन करण्यात येणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २० नवीन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे देखील उद्घाटन होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया, रुग्णालय बांधकाम व पुनर्विकास, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आदी कामांचे भूमिपूजन होणार आहे.  


0000

Prime Minister of India Narendra Modi arrived in Mumbai.

      Mumbai, 19th Jan : Prime Minister of India Narendra Modi arrived in Mumbai on a day's visit. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Eknath Shinde, Dy Chief Minister Devendra Fadnavis welcomed the Prime Minister.


      The Prime Minister will be dedicating to the people Mumbai Metro Line 2 A and 7 (Phase 2), open 20 new 'Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Aapla Davakhana' and lay the foundation of various projects during the visit.


0000



 

Featured post

Lakshvedhi