Friday, 23 December 2022

हसा लेको

 बस स्थानकावर एक स्त्री एका पुरुषाजवळ येते आणि म्हणते,


"माफ करा सर, मी एक छोटासा सर्व्हे करत आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का?"


माणूस म्हणतो, "हो, हो, विचारा ना!


स्त्री: "तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल आणि एखादी महिला बसमध्ये आली आणि तिला जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही तिच्यासाठी तुमची जागा सोडाल का?"


माणूस - "नाही."


स्त्री: "बसमध्ये चढलेली बाई जर गरोदर असेल तर तुम्ही तुमची जागा सोडाल का?


माणूस: "नाही."


स्त्री: "ती बाई जर एखादी वृद्धा असेल तर तुम्ही तुमची सीट द्याल का?"


माणूस: "नाही."


स्त्री: "तू एक स्वार्थी माणूस आहेस, तुझ्यात मूलभूत संस्कारही नाहीत. तु स्वतःला समजतोस तरी कोण?"


माणूस: "बस ड्रायव्हर!"


😂😂

विदर्भातील शेती आणि फळपीकांसाठी ३ हजार १०३ कोटींची नुकसान भरपाई वितरित

 विदर्भातील शेती आणि फळपीकांसाठी ३ हजार १०३ कोटींची नुकसान भरपाई वितरित


विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत


- मंत्री उदय सामंत.

            नागपूर, दि. २२ : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार

 वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य देणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती.

            नागपूर, दि. 22 : महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक कामगारांची जवळपास २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.


            श्री. फडणवीस यांनी सांगितले की, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये लाईटमन तथा तत्सम कामगारांची पदे नाहीत. मात्र राज्य शासन लवकरच महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहे. यामध्ये कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल. प्रत्येक वर्षी पाच गुण देऊन गुणवत्ता यादीवर येण्यासाठी प्रयत्न केले जातील.


            महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटदाराच्या अधिनस्त अंदाजे १७,४४३ कंत्राटी कामगार कार्यरत असून महापारेषण व महावितरणमध्ये सर्वसाधारणपणे अनुक्रमे ३,९४० व २१,५५१ कंत्राटी कामगार बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून काम करतात.


            महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये कामाच्या स्वरूपानुसार प्रासंगिक तसेच तात्पुरती कामे कंत्राटदाराकडून निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून करून घेतली जातात. प्रत्येक वेळेस कंत्राटदार नेमताना बाह्यस्त्रोत कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा केले जाण्याची अट निविदा तसेच संबंधित कंत्राटदाराच्या कार्यादेशामध्ये अंतर्भूत केली जाते. मात्र कंत्राटदार कमी वेतन देतात, याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कंत्राटी कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट वेतन दिले जाईल. कंपनी अधिनियमानुसार किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यासाठी वेतन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. शिवाय वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नाही, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, अनिकेत तटकरे, सचिन आहेर आणि अनिल परब यांनी सहभाग घेतला.


००



पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

 पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना.

- शंभूराज देसाई


            नागपूर, दि. 22 : “पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


            विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी नियम ९४ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            ते म्हणाले, “रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस, महामार्ग पोलिस, राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील”. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी दिली.


            “या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे सन २०१६ पासून अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. स्पीड गनची संख्या वाढवणे, अवजड वाहने डाव्या मार्गिके मधूनच जातील याकडे लक्ष देणे याबाबत परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अधिक सुरक्षित प्रवासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या केल्या जातील”, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार

 राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार

 - मंत्री डॉ.तानाजी सावंत


            नागपूर, दि. 22 : राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणे, भिवंडी, मालेगाव, वसई विरार अशा विविध ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या 100 टक्के आटोक्यात आणू, असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.


            राज्यात साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सदस्य रमेश कोरगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, आरोग्य विभाग धोरणात्मक निर्णय घेऊन गतीने काम करत आहे. संबंधित योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन त्या विभागातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे आरोग्य कसे सुधारेल, याबाबत उपाययोजनांसाठी महिनाभरात धोरण आणण्यात येईल.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, अबू आझमी, ॲड. आशिष शेलार, यामिनी जाधव, रइस शेख यांनी सहभाग घेतला होता.


००००


 


आरोग्य विभागात भरती प्रक्रिया


            आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.


 बालकांच्या लसीकरणावर कृती दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाला गोवरचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.


उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी


            मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची बाब गंभीर असून याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.


0000



 




कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही

 कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही

- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

            नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.


            मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.


            राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.


०००००


गोपाळ साळुंखे/स.सं.



 


वृत्त क्र. ६६


 



जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेशनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

 जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेशनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

            मुंबई, दि. 22 : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दि. 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायं.5.00 या वेळेत महानगर पालिका शाळा, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी नाका, वरळी-18 येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.


            यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


            या महारोजगार मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार, एअरटेल इ. उद्योजक सहभागी होणार असून दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक व इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एच आर, अॅप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ॲण्ड एन्टरटेंमेंट अशा प्रकारे विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध असणार आहेत.


            या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय उपलबध करून देणारे विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती पुरविणारी दालने लावण्यात येणार असून याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही यामध्ये समावेश असणार आहे.


            मुंबई शहर येथील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.



Featured post

Lakshvedhi