Friday, 23 December 2022

राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार

 राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार

 - मंत्री डॉ.तानाजी सावंत


            नागपूर, दि. 22 : राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणे, भिवंडी, मालेगाव, वसई विरार अशा विविध ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या 100 टक्के आटोक्यात आणू, असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.


            राज्यात साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सदस्य रमेश कोरगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.


            मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, आरोग्य विभाग धोरणात्मक निर्णय घेऊन गतीने काम करत आहे. संबंधित योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन त्या विभागातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे आरोग्य कसे सुधारेल, याबाबत उपाययोजनांसाठी महिनाभरात धोरण आणण्यात येईल.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, अबू आझमी, ॲड. आशिष शेलार, यामिनी जाधव, रइस शेख यांनी सहभाग घेतला होता.


००००


 


आरोग्य विभागात भरती प्रक्रिया


            आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.


 बालकांच्या लसीकरणावर कृती दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाला गोवरचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.


उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी


            मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची बाब गंभीर असून याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.


0000



 




No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi