Wednesday, 15 June 2022

 मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव

प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातीलसर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मराठी - गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

            मुंबई, दि. 14 : गेल्या २ वर्षात कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वच भाषेतल्या पत्रकारांनी, दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. भारतातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱ्या काळात सुद्धा वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल, अशी अपेक्षा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच्या काळात मराठी आणि गुजराती एकमेकांमध्ये दुधात साखरेप्रमाणे विरघळून गेले आहेत, त्यामुळे मराठी - गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे, हीच माझी सदिच्छा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

            भारतातील सर्वांत जुने वर्तमानपत्र अशी ओळख असणाऱ्या मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडला. द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासह मुंबई समाचार वृत्तपत्राचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

            मुंबई समाचार वृत्तपत्राचे अभिनंदन करून श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आहे. भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी वृत्तपत्राचे उद्दिष्ट राष्ट्रीयत्व जपणे हेच होते. मुंबई समाचार केवळ बातम्यांचे माध्यम नाही तर तो एक समाजाचा वारसा आहे. मुंबई समाचार वृत्तपत्रातून भारताचे दर्शन घडते. अनेक संकटाना तोंड देत भारत कशा प्रकारे अढळ राहिला, याचे दर्शन आपल्याला मुंबई समाचारमधूनही मिळते. येणाऱ्या काळात मुंबई समाचार आपली ही परंपरा टिकवून ठेवेल, असा विश्वास वाटतो. समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या देण्याचे, बातम्यांमधून लोकशिक्षण करण्याचे, समाज आणि सरकारमध्ये काही उणीवा असतील तर त्या वाचकांसमोर आणण्याचे काम वृत्तपत्रांचे आणि प्रसारमाध्यमांचे आहे.

            गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत असलेले मुंबई समाचार हे एक गुजराती वृत्तपत्र असले तरी सर्वसामान्य वाचकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे याचा आनंद आहे. मुंबई समाचारने स्वातंत्र्यचळवळीला आवाज दिला आणि नंतर स्वतंत्र भारताची प्रगती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली;भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुंबई समाचार वृत्तपत्राची २०० वर्षे एकाच वर्षी साजरा होणे हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई समाचार वृत्तपत्राने आपला इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर आणावा जेणेकरून आजच्या पिढीला भारताचा इतिहास समजण्यास मदत होईल, असेही श्री. मोदी म्हणाले.


            मुंबई समाचार वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा.

            आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे कठीण आहे. वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणे, पत्रकारांचे कर्तव्य असते आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहेत. मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

            मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की, सर्वात जुने वर्तमानपत्र अशी ओळख असलेले मुंबई समाचार २०० व्या वर्षात पर्दापण करीत आहे. १८२२ मध्ये बॉम्बे समाचार या नावाने साप्ताहिक म्हणून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. दक्षिण मुंबईतील फोर्ट संकुलाच्या मध्यभागी असलेल्या रेड हाऊस नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र अथा्र्त मुंबई समाचार २०० वर्षाचा टप्पा गाठत आहे.

            सलग २०० वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचारच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका स्मृती तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

 औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा

            मुंबई, दि. 14 : औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला.

            औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हसेकर, जे.एम.सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते.

            औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, प्रशासकीय अधिकारी व अधीक्षक यांच्या पात्रता निश्चित करण्यात करणे, कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी नियमितरित्या भरणे, रुग्णालयात मंजूर असलेल्या 1177 खाटांपेक्षा जास्त रुग्ण खाटा सुरु असल्याने निधीचा कमतरता, औषधी, सर्जिकल, यंत्रसामुग्री आणि उपकरणे, पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करणे अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग पदाची भरती बाबत जाहिरात देवून ती पदे तातडीने भरावी, असे निर्देश श्री.देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वैद्यकीय शिक्षण विभागातील अध्यापकीय पदे व वर्ग 3 व 4 गटातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही करावी. औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबतच्या विविध विषयांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करुन संबंधित विषयाला गती द्यावी, असे निर्देशही मंत्री श्री.देशमुख यांनी दिले.





Tuesday, 14 June 2022

रोजगार

 राज्यात मेमध्ये २१ हजार ५५६ युवकांना रोजगार

- कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि. 14 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये मे २०२२ मध्ये २१ हजार ५५६ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

            विविध उपक्रमांमधून राज्यात जानेवारी ते मे २०२२ अखेर ६८ हजार ४४३ उमेदवार नोकरीस लागले आहेत. मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

               मंत्री श्री. टोपे म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

            विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९५ हजार ४५० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. टोपे म्हणाले की, माहे मे 2022 मध्ये विभागाकडे ३३ हजार ६७७ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ६७९, नाशिक विभागात ४ हजार ३९५, पुणे विभागात १८ हजार १५८, औरंगाबाद विभागात २ हजार २२६, अमरावती विभागात १ हजार ५०० तर नागपूर विभागात १ हजार ७१९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

            माहे मेमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५५६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ०२७, नाशिक विभागात २ हजार ३२७, पुणे विभागात सर्वाधिक १४ हजार ३१३, औरंगाबाद विभागात ३३३, अमरावती विभागात ३४८ तर नागपूर विभागात २०८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

            नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले आहे.

०००

 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य सप्ताह

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

            मुंबई, दि. 14 : येत्या 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्यात स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत असून यामध्ये चार स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून हे कार्यक्रम नेमके कोणते असावेत, या कार्यक्रमांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा, कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी, प्रत्येक स्तरावर तो कार्यक्रम वेगळा कसा असेल याबाबतचे नियोजन पुढील बैठकीत सादर करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.


            भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोअर समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक‍ न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे पद्धतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राज्यस्तरीय कोअर समिती आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची रुपरेषा ठरविणे तसेच निधीची उपलब्धता याबाबत निर्णय घेणार आहे.


            मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राज्यात “हर घर तिरंगा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 11 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये तिरंगा फडकवला जाण्याचे नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत सर्व तयारी करावी.साधारणपणे महाराष्ट्रासाठी दोन कोटी तिरंग्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे संविधानाचे नियम पाळून याबाबतची सर्व तयारी करण्यात यावी. येत्या 15 ऑगस्ट रोजी मरीन ड्राईव्ह येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त भारताची गेल्या 75 वर्षांतील प्रगती यावर आधारीत एका विशेष लेझर शोचे आयोजन करण्यासाठी तयारी करण्यात यावी. येत्या 9 ऑगस्ट रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र घेऊन एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन विधानभवनात करण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषीबरोबरच कामगार आणि उद्योगक्षेत्राची प्रगती यांचाही समावेश या आजादी का अमृत महोत्सवात केला जावा. तसेच गावपातळीवर यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांचा समावेश व्हावा अशा सूचना कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले की, आज महाराष्ट्रात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग हे आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळेच आजादी का अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य अभियान राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय कार्डियाक कॅथलॅब यासह आयुष्यमान हेल्थकार्डची अधिक नोंदणी यावरही भर देण्यात येणार आहे.

            सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्वाच्या अशा शाळा, वसतीगृहे आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य दोन योजनांचा समावेशही आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांनी केल्या. आजादी का अमृत महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमाची मांडणी माहितीपूर्ण असण्याबरोबरच आजच्या तरुणवर्गाला आकर्षित होण्यासाठी सामाजिक माध्यमांचा अधिक वापर करुन करण्यात यावा.

            मंत्री श्री.केदार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी सेवाग्राम आश्रम येथे शिक्षण विभागाच्या मदतीने चर्चासत्रे आयोजित करण्यात यावी, यामध्ये एनसीसी यांचाही समावेश करण्यात यावा.याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील एका शाळेचा ऐतिहासिक शाळा म्हणून समावेश करण्यात येणार असून संबंधित पालकमंत्री या शाळेची निवड करतील.

            आजादी का अमृत महोत्सवाचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यासाठी कोअर समितीचे सर्व मंत्री यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित सचिव यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात यासंबंधी विस्तृत बैठक घेतली जाईल.

            भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ 12 मार्च 2021 रोजी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकशाही मुल्ये आणि भारतीय संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. पुढील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.यापूर्वीच सर्व सरकारी पत्रव्यवहारामध्ये आझादी का अमृत महोत्सव हे संकेतचिन्ह वापरण्यात येणार आहे.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन.



            मुंबई दि. 14 : प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचे आय एन एस शिक्रा, मुंबई येथे आज हेलिकॉप्टरने दुपारी 4.00 वाजता आगमन झाले.

            यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर तसेच तिन्ही सैन्य दलांचे व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



वटवृक्ष

 *🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*

----------------------------------------

*संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*

----------------------------------------

*🏵 वटसावित्री व्रतामागील शास्त्रीय भूमिका कोणती.*


           *वटसावित्री व्रतावरील साहित्य संकलित केले, तर एक ग्रंथ तयार होईल. वटसावित्री व्रतातील महत्त्वाचे कथासूत्र म्हणजे, "सत्यवानाचे प्राण यमधर्माने हरण केले तेव्हा सावित्रीने यमधर्माशी शास्त्रचर्चा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. हा प्रसंग वटवृक्षाखाली तब्बल तीन दिवस चाललेला होता." कथेचे सूत्र अनुसरून व्रताचे स्वरूप तयार केले गेले. तीन दिवस उपवास, रात्री जागरण, वटवृक्षाची पूजा व सूत्रवेष्टन आणि शेवटी दानधर्म, उपवास म्हणजे नेहमीप्रमाणे खिचडी, वरी, फळफळावळ, दुधाचे पदार्थ भरपूर खाणे.*


           *वडाखाली जाणे होत नसल्यास वडाची फांदी बाजारात तयार असतेच. हे सर्व विडंबन पाहिले म्हणजे एखाद्या आधुनिक विचारवंत स्त्रीला वाटू लागते की, असले विकृत वटसावित्री व्रत करण्यापेक्षा न केलेले बरे. या व्रताच्या अगोदर दोन-तीन दिवस चाललेला वटसंहार पाहून विचारी मनास ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. अशाने या व्रताचा उद्देश सफल होणे दूरच, पण वनसंहार थांबवण्यासाठी वनरक्षणखात्यास एक ना एक दिवस कायद्याने वटसंहार थांबवावा लागेल.*


           *वटसावित्री व्रत खऱ्या अर्थाने करायचे असेल तर स्त्रियांनी प्रथम पतिविषयीचे सर्व गैरसमज साफ दूर करावेत. त्याच्या एवढ्यातेवढ्या विधानाची सत्यासत्यता पटवून घेण्याचा आटापिटा सोडावा. त्याच्या बारीकसारीक वर्तनास आवाहन देणे सोडावे. तो काय म्हणतो, हे आपल्याला कितपत कळते, हे पहावे. कळल्यावर ते पटते किंवा नाही हे समजून घ्यावे. एवढे केले, तरी वटसावित्री व्रताचे निम्मे फळ मिळेल. उरलेले निम्मे फळ मिळण्यासाठी वटसावित्री व्रतापूर्वी तीन, दोन किंवा निदान एक दिवस कमीतकमी खाऊन उपवास करावा. व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त काळ वटवृक्षाखाली व्यतीत करावा, पूजा करावी, जास्तीतजास्त प्रदक्षिणा कराव्यात. प्रदक्षिणा करताना हातात दोरा असलाच पाहिजे असे नाही. वटवृक्षाला पूजेच्या वेळी "वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं " म्हणून एक, तीन, पाच वेढे घालावेत.*


           *वटसावित्रीव्रतामध्ये असणाऱ्या सर्व भूमिका नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रतिकात्मक आहेत. वड हा चिरंजीव वृक्षांपैकी एक आहे. वडाची साल जुनाट व्याधी निवारक व आयुष्यवर्धक आहे, हे आयुर्वेदिक सत्य आहे. वटवृक्षाच्या सहवासात अधिकाधिक काळ घालविल्यास निरोगी दिर्घायुष्य लाभते. यमधर्म हे पात्र ही प्रतिकात्मक आहे. नीतिनियमाविषयी तयार केलेल्या संहितेस "यम" ही संज्ञा आहे. सत्यवान म्हणजे सत्याची कास धरून वागणारा. त्यालाही नीतिनियम चुकले नाहीत. पण वटवृक्षाचे सेवन केल्यास नेहमीचे नियतीचे नियम देखील अपवाद निर्माण करू शकतात.*


           *अशाप्रकारे व्रताचा खरा अर्थ व उद्देश समजून व्रत केल्यास निश्चित फळ मिळेल. पण हे व्रत विडंबनात्मक रित्या साजरे करण्यापासून नेहमी परावृत्त व्हावे. वटवृक्षाच्या सान्निध्यात जाणे सर्वथैव अशक्य असल्यास एखाद्या पाटावर चंदनगंधाने वटवृक्ष काढून पूजाप्रदक्षिणा कराव्यात. पण वडाच्या संहारास उत्तेजन देऊ नये. ज्याची पूजा करायची त्याचेच अवयव तोडणे यापेक्षा दुष्कृत्य ते कोणते ?*


*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*









 

Featured post

Lakshvedhi