Saturday, 25 December 2021

 नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत

                                     -सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 24 : अतिवृष्टी, पूर, वादळे आणि कोरोना महामारीसारख्या भयावह संकटांना राज्य शासनाने सक्षमपणे तोंड दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागील दोन वर्षात ११ हजार कोटीचे पॅकेज राज्यशासनाने घोषित केले. अशा संकटकाळात केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने ११ हजार कोटीची मदत केली. त्यातील ४ हजार कोटी रुपये एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.

            विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी २६० अन्वये सादर केलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री.मुंडे बोलत होते.

            सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, शासनाने कर्जमाफीची घोषणा करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्याचे कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यावर एका वर्षाच्या आत जमा केले. तसेच कोरोना सारख्या संकटकाळातही शासनाने शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळवून दिला. कोरोना काळात मुंबईतील धारावी भागात राज्यशासन व महापालिकेने केलेल्या प्रभावी कामाची दखल डब्लूएचओने घेवून या कामाची प्रशंसा केली. ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. तसेच राज्यात कोविडसह इतर संकट असतानाही नागरिकांना सर्व सेवा-सुविधा व्यवस्थितपणे पुरविण्यात आल्या. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यातील अनेकांनी महाराष्ट्राची सेवा केली त्यातून आजचा महाराष्ट्र घडला असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले.

            या प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री भाई गिरकर, परिणय फुके, विनायक मेटे, डॉ.रणजित पाटील, निलय नाईक, प्रविण पोटे-पाटील, निरंजन डावखरे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

 महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध                                                                    - उपमुख्यमंत्री अजित पवार

· विदर्भ, मराठवाड्यावर निधीवाटपात अन्याय नाही; वैधानिक विकास महामंडळाच्या निकषानुसारच वितरण

· ३१ हजार ६२४ कोटी रुपयांचा ‘जीएसटी’चा परतावा केंद्राकडून बाकी

· नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांच्या पाठीशी राज्य शासन;

· ‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा अधिकच्या निधीचे वाटप

· मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प टप्प्या-टप्प्याने पूर्ण करणार

            मुंबई, दि. २४ :- विदर्भ-मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रांतर्गत निदेशानुसार घालून दिलेल्या निकषापेक्षा अधिकच्या निधीची तरतुद विदर्भ-मराठवाड्यासाठी करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासनिधीत कुठलीही कपात केलेली नाही. राज्याच्या एकसंध विकासासाठी शासन कटीबध्द असून विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीकाळात शेतकऱ्यांना ‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा अधिकची मदत सरकारने केली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा चालू करण्यात येईल, मात्र त्यांना किमान चालू थकीत वीजबील भरावे लागेल. चालू वीजबील भरल्यानंतर कृषीपंपांचा खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. एसटी महामंडळाचे कर्मचारी आपलेच आहेत. त्यांच्या पगारात भरीव वाढ केली असून एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता संप मागे घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

            विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यासमोरील अनेक महत्वाच्या प्रश्नांवरील सरकारची भूमिका स्पष्ट केली. चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विदर्भ-मराठवाडा उर्वरीत महाराष्ट्र विकास महामंडळाचा कार्यकाल संपला असला तरी महामंडळाच्या उद्दीष्टांची पूर्ती राज्य सरकार करीत आहे. विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यक्षेत्रांतर्गत निदेशीत करण्यात आलेल्या निधीपेक्षा अधिकच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. राज्य शासनाने आर्थिक वर्ष २०२१-२२ करता लोकसंख्येच्या प्रमाणात विदर्भासाठी २३ टक्के निधी देणे अपेक्षीत असताना २६ टक्के निधी वितरीत केला. मराठवाड्यासाठी १८ टक्के निधी देणे अपेक्षीत असताना १८ टक्केच निधी दिला. उर्वरीत महाराष्ट्रासाठी ५८.२३ टक्के निधी देणे अपेक्षीत असताना ५५.३८ टक्के निधीचे वितरण करण्यात आले आहे.

            यासंदर्भात अधिक माहिती देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सन २०१३-१४ ते सन २०१७-१८ या पाच वर्षाच्या कालावधीत विदर्भासाठी सरासरी २४.८५ टक्के, मराठवाड्यासाठी सरासरी १५.४२ टक्के तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी केवळ ४३.६२ टक्के निधी प्रत्यक्ष खर्च करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विकास महामंडळ निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली असल्याची माहीती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा अधिकची मदत...

            गेल्या दोन वर्षात राज्यातील जनतेला चक्रीवादळे, पूरस्थिती, अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नैसर्गिक संकटाच्या काळात ‘एसडीआरएफ’च्या निकषापेक्षा गतवर्षी १ हजार ७७४ कोटी रुपये तर, यंदा चालूवर्षी १ हजार १९० कोटी रुपयांची अधिकची मदत राज्यातील जनतेला केली आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये त्यासाठी ६ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात नुकसानग्रस्तांना अधिकची मदत मिळण्यासाठी ‘एसडीआरएफ’च्या निकषात वाढ करण्याची मागणी राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे केली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

*मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प...

           मराठवाड्याचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद केला जाणार नाही, तो टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील सर्व प्रकल्पातील पाण्याची स्थिती चांगली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

पीक विमा योजना...

            पंतप्रधान पीक विमा योजना व्यवहार्य नाही, असे अनेक जाणकार, तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, मणीपूर ही राज्ये बाहेर पडली आहेत. अरुणाचल प्रदेश, झारखंड, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब व तेलंगणा या राज्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देणारा पीक विमा योजनेला दुसरा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई...

            राज्यातील नोकरभरती प्रक्रियेसह पेपरफुटीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य दिशेने सुरु आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात येणार आहेत. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. ‘एमपीएससी’वरील ताण लक्षात घेता ‘एमकेसीएल’, ‘आयबीपीएस’ आणि ‘टीसीएल’ या मान्यताप्राप्त कंपन्यांच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येईल. पोलिस दलाची भरतीप्रक्रिया त्यांच्याच विभागामार्फत होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडून ३१ हजार ६२४ कोटी रुपयांचा ‘जीएसटी’चा परतावा बाकी

कोरोना संकटासह अनेक नैसर्गिक संकटांचा सामना राज्याने यशस्वीपणे केला आहे. कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र सर्व संकटावर मात करुन विकासकामे सुरु आहेत. पायाभूत प्रकल्पांचा वेग कायम ठेवण्यात आला आहे. आर्थिक शिस्तही बिघडू दिलेली नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्राकडून राज्याच्या हक्काचा असणारा ३१ हजार ६२४ कोटी रुपयांच्या ‘जीएसटी’चा परतावा बाकी असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेच्या उत्तरात दिली.



 पुणे येथील भिडेवाडा शाळेच्या जागी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील

-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 24- पुणे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांनी सुरू केलेल्या भिडेवाडा शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. या जागेचे प्रकरण न्यायालयात असून त्यावर तोडगा काढून या जागी पुन्हा शाळा सुरू करून स्मारक व्हावे, यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल आणि स्मारकाच्या कामासाठी नगरविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यासंबंधी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना श्री शिंदे बोलत होते. हा विषय सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हे स्मारक व्हावे हे सर्वांचेच मत आहे. त्यामुळे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री शिंदे यांनी सांगितले.

00000

 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 22 : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणी ॲपवर 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.

            राज्याती ई-पीक पाहणी ॲपीची सक्ती न करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य सर्वश्री संग्राम थोपटे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. थोरात म्हणाले की, ई-पीक पाहणी हे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूकता यासाठी महत्वाचे असून हा प्रयोग देशपातळीवरही अवलंबला जाईल अशी खात्री आहे. ई- पीक पाहणी हा कार्यक्रम टाटा ट्रस्टच्या सहकार्याने 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या पीक पाहणीचा उपयोग महसूल विभागाबरोबरच कृषी, पणन आणि नियोजन विभागाला होणार आहे. एका अँड्रॉईड फोनमधून साधारण 50 शेतकऱ्यांच्या पीकांची नोंदणी करण्यात येते त्यामुळे जेथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी नोंदणी करीत असताना विशेष काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना काही अडचणींमुळे ई-पीक पाहणी करता आली नाही तर तलाठी स्तरावरुन पूर्वीप्रमाणे पीक पेऱ्याची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अचूक पिकांच्या नोंदी गाव नमुना 12 मध्ये होणे आवश्यक असल्याने शेतकरी यांनी स्वत: ई पीक पाहणीद्वारे पीक पेरा नोंदविणे शेतकरी हिताचे आहे. 6 जिल्ह्यांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आलेले पीक पाहणी सर्वेक्षण यशस्वी होते का याचा सुद्धा अभ्यास करण्यात येईल, असेही श्री.थोरात यांनी सांगितले.

--

वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी व पंचनामे करण्यात येणार

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 22 : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पुन्हा करण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

            अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुर्जी शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखडे, प्रकाश सोळंके, यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. थोरात म्हणाले की, जून आणि जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती खरडून गेलेली असताना यादीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत बोर्डावर प्रसिध्द केली होती. तसेच या यादीबाबत काही आक्षेप असल्यास 8 ऑगस्ट 2021 पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळविले होते. तसेच 5 ऑगस्ट 2021 रोजी प्राप्त आक्षेपांबाबत संयुक्त पथकाने शेतीची पाहणी आणि पंचनामा करुन प्राप्त आक्षेप विहीत कालावधीत निकाली काढलेले आहेत.

---

केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा

कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा

- कृषी मंत्री दादाजी भुसे

            मुंबई, दि. 22 : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

            जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य कुणाल पाटील, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. भुसे म्हणाले की, आंबिया बहार 2019-20 मध्ये केळी या फळपिकासाठी जळगाव जिल्ह्यातील 42 हजार 377 शेतकऱ्यांनी 54 हजार 354 हेक्टर क्षेत्राकरिता सहभाग नोंदविला होता. योजनेतील अटी- शर्ती आणि महावेध प्रकल्पामार्फत प्राप्त हवामानाच्या आकडेवारीनुसार 41 हजार 578 शेतकऱ्यांना 371.94 कोटी रुपये इतकी विमा नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आली आहे.

---

 समृद्धी महामार्गालगत सनदी अधिकाऱ्यांच्या

नातेवाईकांनी जमिनी विकत घेतल्याच्या माहितीमध्ये तथ्य नाही

- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. यामार्गालगत उद्योग, रोजगार वाढून समृद्धी निर्माण होणार आहे. या मार्गालगत काही सनदी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी जमिनी घेतल्याच्या माहितीची कोकण विभागीय आयुक्त तसेच लोकायुक्तांनी सविस्तर चौकशी केली असून यामध्ये तथ्य आढळून आले नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंबंधी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी श्री.शिंदे यांनी ही माहिती दिली. या मार्गालगत जमिनींचे दर रेडीरेकनर नुसार ठरविण्यात आले आहेत. यामध्ये कुठे कमी दर दिल्याचे उदाहरण समोर आल्यास त्याबाबत बैठक घेऊन चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००००



 

 अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी

तालुका स्तरावर भरारी पथकाची स्थापना

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. 22 : गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.या भरारी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या काळात 51 प्रकरणात 1 कोटी 21 लाख 79 हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

            बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री लक्ष्मण पवार, भास्कर जाधव, आशीष जयस्वाल, सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. थोरात म्हणाले की, गोदावरी नदी पात्रातील जागेचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसिलदार यांच्यासमवेत पंचनामा केल्यानंतर वाळुमाफियांनी नियमांचे उल्लंघन करुन आधुनिक साधनांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन नदी पात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे केले असल्याचे खरे नाही. नदीला पूर आल्याने 17 वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण 5 टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाबरोबर समन्वयाने काम करण्यात येईल. तसेच राज्यभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये 970 आरोपी अटक करण्यात आले असून 46 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. लवकरच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष यांच्याशी सुद्धा या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे श्री.थोरात यांनी सांगितले.

 विधानसभा प्रश्नोत्तरे :

बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन

- फलोत्पादन मंत्री संदीपानराव भुमरे

            मुंबई, दि. 22 : बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात आल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपानराव भुमरे यांनी विधानसभेत सांगितले.

            सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

            श्री. भुमरे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सीताफळांवर काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावाने फळांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सीताफळांच्या झाडावर त्याचा दुष्परिणाम झालेला नाही. 9 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात शेतकऱ्यांना याच्या नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले 

Featured post

Lakshvedhi