अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या
- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. ६ : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ नसल्याने १५ किमीवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनमधील प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, चिखलदऱ्याच्या ग्रामीण भागातील ३६ गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा होतो, ही गंभीर बाब आहे. मजिप्रा, जलजीवन मिशन योजना निधीअभावी रखडू देवू नका. दुर्गम भागातील पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या. मेळघाटातील योजना आदिवासी आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अचलपूर आणि चांदूरबाजार भागातील काही गावे पादेशिक पाणीपुरवठा योजनांमधून सुटलेली आहेत. गावांच्या मागणीनुसार सद्य:वस्तुस्थितीचे पुन्हा सर्वेक्षण करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, त्यानंतर त्या गावांचा मजिप्रा योजनेत समावेश करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
No comments:
Post a Comment