सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सेवा निवास वसाहतींचा पुनर्विकास
- राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. ३० : राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ४६ सेवा निवास वसाहतींपैकी ३० वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी २३ ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. उर्वरित सात ठिकाणी रहिवाशांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार स्वेच्छानिवृत्ती, सेवानिवृत्ती अथवा मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सर्व महानगरपालिकांमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही सुरू आहे.
महानगरपालिकांवरील कचरा व्यवस्थापनाचा वाढता ताण लक्षात घेऊन स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्प, बायो-मायनिंग, एसटीपी प्रकल्प आणि घरगुती शौचालयांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील प्रमुख शहरांचा आर्थिक विकासाचा वेग वाढविण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर या शहरांची 'ग्रोथ इंजिन' म्हणून निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटन आणि ॲग्रो-लॉजिस्टिक्स पार्क यांसारख्या पायाभूत सुविधांचे सर्वंकष नियोजन करण्यात येत आहे.
ठाणे शहराच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर शासनाने राबविलेल्या नव्या योजनांमुळे शहराची पाण्याची संपूर्ण गरज पूर्ण करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावठाण आणि कोळीवाड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment