दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदिवासी महिला व
नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी १५ दिवसांत चौकशी समिती
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १० :दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदिवासी महिला व नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी १५ दिवसांत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करणार, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधापरिषदेत दिली.
ठाणे जिल्ह्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी महिला व नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा तक्रारीच्या मुद्दा सदस्य चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. या चर्चेत प्रवीण दरेकर, डॉ. नीलम गोऱ्हे, भावना गवळी यांनी सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील मेंदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातील महिला सविता विनोद रावते यांच्या मृत्यू प्रकरणात आशा सेविकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेले अन्य मुद्देही गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येईल.
या चौकशीत संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ), वरिष्ठ अधिकारी किंवा अन्य दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. केवळ चौकशी समिती स्थापन करून प्रकरण प्रलंबित ठेवले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेला प्राधान्य देण्यात येत असून विशेषतः आदिवासी भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
0000
No comments:
Post a Comment