Tuesday, 14 July 2026

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी बीएसएनएलसोबत समन्वय मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर

   खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी बीएसएनएलसोबत समन्वय

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर

- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. १४ : राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय विभागाने भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून बीएसएनएल ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिसची माहिती घेतली असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बीएसएनएलचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास मानकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या 'मच्छिमार सुरक्षा प्रथम' या धोरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत असून, सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध झाल्यास राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमामुळे समुद्रातील संप्रेषण अधिक सक्षम होण्यासोबतच मच्छिमारांचा आत्मविश्वास वाढेल आणि मत्स्यव्यवसाय अधिक सुरक्षित व आधुनिक करण्याच्या दिशेने महाराष्ट्र आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi