बिलोली व वैजापूर क्रीडा संकुलांची रखडलेली कामे लवकर पूर्ण करणार
– सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
दिरंगाईची चौकशी करून संबंधितांवर कारवाई
मुंबई, दि. ८ : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामांसाठी वाढीव निधीची फेरनिविदा प्रक्रिया सुरू असून, काम लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच कामातील दिरंगाई आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितांवर मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
विधानसभा सदस्य जितेश अंतापुरकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य रमेश बोरनारे यांनी सहभाग घेतला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले की, बिलोली तालुका क्रीडा संकुलाला ७ मे २०१८ रोजी १ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, तर १८ जानेवारी २०१९ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. बहुउद्देशीय हॉल, कार्यालयीन इमारत, संरक्षक भिंत, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी आतापर्यंत सुमारे ९५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यानुसार बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित कामासाठी काढलेल्या निविदेवर हरकती आल्याने फेरनिविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुका क्रीडा समितीशी चर्चा करून पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment