महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी
- मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 9 : महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी म. वि. प. नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते. या चर्चेत सदस्य परिणय फुके, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री सावे म्हणाले की, मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक येथे नवीन वसतिगृहांचे बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महाज्योतीच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांमधून सध्या 6900 विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेत आहेत, तर 14 हजार विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमांत सहभागी झाले आहेत. याशिवाय 2709 विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला आहे. यूपीएससी परीक्षेत 100, एमपीएससी परीक्षेत 371 आणि पोलीस भरती, बँक व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये 2031 उमेदवारांना यश मिळाले असून, एकूण 2500 विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्व्हेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत (पुणे), महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MDC), महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पुणे) यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 21.75 लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्व्हेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment