महोत्सवादरम्यान १० मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा (IDPA) ओपन फोरम तसेच दुसऱ्या आवृत्तीतील ‘वेव्हज् डॉक बाजार’ आयोजित करण्यात येणार आहे. डॉक बाजारसाठी १५५ प्रस्ताव प्राप्त झाले असून निवडक प्रकल्पांना मार्गदर्शन व उद्योग क्षेत्रातील व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रकाश मगदूम यांनी यावेळी सांगितले.
महोत्सवाचे उद्घाटन व समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे. एनएफडीसीच्या पाच प्रदर्शन स्थळांबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT), तसेच बांद्रा आणि विलेपार्ले येथील दोन महाविद्यालयांमध्येही चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण १८ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एकूण पारितोषिक रक्कम ४५ लाख रुपये आहे. याशिवाय १० लाख रुपयांचा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. यंदा व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment