मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ
मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आयोजित १९वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) १५ ते २१ जून दरम्यान मुंबईत होणार असून यंदाच्या महोत्सवात प्रथमच १९ निवडक मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शनासोबत आयोजित करण्यात आले आहे. निवडक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. महोत्सवाचे आयोजन एनएफडीसी संकुलासह विविध ठिकाणी करण्यात आले असून यंदा एनएफडीसी व फिल्मसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. यावेळी पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होत्या.
फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एनएफडीसी यांच्यातील सहकार्यामुळे मराठी चित्रपट, माहितीपट आणि सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे.
रविंद्र नाट्य मंदिरात १६ ते २० जून दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, ग्रामीण जीवन, वारसा आणि मानवी नातेसंबंध या विषयांवरील चित्रपटांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने मराठी माहितीपटांसाठीची आर्थिक मदत १० लाख रुपयांवरून २५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून, गुणवत्तापूर्ण माहितीपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे म्हसे पाटील यांनी सांगितले.
फिल्मसिटी केवळ चित्रीकरण सुविधा पुरविण्यापुरती मर्यादित न राहता आशय निर्मिती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय होत असून मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मितीचे प्रकल्प हाती घेत असल्याची माहितीही म्हसे पाटील यांनी दिली.
१९९० मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे हे १९वे पर्व असल्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. यंदा महोत्सवासाठी १,४५९ चित्रपटांच्या नोंदी प्राप्त झाल्या. त्यापैकी स्पर्धा विभागात १४४ चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ९२ भारतीय आणि ५२ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात २०२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या विभागात ४६ देशांतील चित्रपटांचा समावेश असून ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्स’सह, ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ या नव्या विभागाची भर घालण्यात आली आहे.
महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये ज्येष्ठ ॲनिमेशन दिग्दर्शक रेमंड क्रुमे यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह आणि त्यांची विशेष मास्टरक्लास, तसेच प्रसिद्ध माहितीपट निर्माते डेव्हिड अॅटनबरो यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सीक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment