Tuesday, 30 June 2026

'एल निनो'चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती; कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा

 'एल निनो'चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती;

कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीचा धडक कार्यक्रम राबवा

 

मुंबई, दि. 30 : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये 'एल निनो'बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी शासन सज्ज आहे. त्यामुळे एल निनोचे संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


राज्यामध्ये नादुरुस्त असलेले कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राधान्याने दुरुस्त करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नादुरुस्त असलेले कोल्हापुरी बंधारे 'आर्च पद्धतीने ' पुलवजा करण्याबाबत पडताळणी करण्यात यावी. जलसंधारणाचे कुठलेही नवीन काम न घेता दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील वर्षांमध्ये महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थिती असलेले भाग चिन्हांकित करावे. संबंधित भागात तत्कालीन परिस्थितीमध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अहवाल द्यावा. त्यावर आधारित किंवा आवश्यक ते बदल करून यावेळी उपाययोजना करण्यात याव्यात.

कामे पूर्ण करण्यास असलेला कालावधी लक्षात घेता या कामांसाठी गतीने प्रक्रिया राबवावी. नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्यात यावी. नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये दुरुस्ती करताना धातू विरहित पद्धतीचा पर्याय शोधण्यात यावा. ही उपाययोजना कायमस्वरूपी असावी. याबाबत यंत्रणा निश्चित करून संबंधित यंत्रणेकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात यावी. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता लवकर पूर्ण होतील, अशीच जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावीत. याबाबत संपूर्ण कार्यवाहीचे अधिकार पाटबंधारे विकास महामंडळ स्तरावर देण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi