आपत्ती व्यवस्थापनात समाजमाध्यमांचा प्रभावी वापर महत्वाचा
- संचालक डॉ. किशोर गांगुर्डे
· पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी
मुंबई, दि. २९ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी केवळ प्रत्यक्ष यंत्रणाच नव्हे, तर अधिकृत सोशल मीडिया माध्यमेही प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालये, महापालिका आणि विविध विभागांनी आपली अधिकृत सोशल मीडिया हँडल्स सक्रिय ठेवून नागरिकांना वेळोवेळी अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे यांनी केले.
पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत मुंबईतील सर्व यंत्रणांच्या विभागांच्या जनसंपर्क अधिकारी यांची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली. या बैठकीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे बोलत होते, बैठकीला संचालक(माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (माहिती) वर्षा आंधळे, प्र. उपसंचालक (प्रशासन) डॉ. जगदीश मोरे व मुंबईतील विविध शासकीय यंत्रणांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.
संचालक डॉ. किशोर गांगुर्डे म्हणाले की, यंदा अद्याप पावसाची सुरुवात झालेली नसली, तरी पावसाळ्यापूर्वीच सर्व यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर महापालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अशा संस्थांच्या जनसंपर्क अधिका-यांनी आपापल्या स्तरावर केलेल्या उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत नियमितपणे पोहोचवावी. आपत्तीच्या काळात अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्यास अफवा आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरते. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये आणि महापालिकांनी आपली अधिकृत सोशल मीडिया हँडल्स वेळीच तपासून घ्यावीत आणि त्यांचा नियमित वापर करावा.
No comments:
Post a Comment