शासनाच्या ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
· महाराजस्व समाधान शिबिरात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे आवाहन
मुंबई, दि. १४ : शासन नागरिकांसाठी आहे. घरबसल्या शासनाच्या सर्व ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊन वेळ आणि पैशांची बचत करावी, असे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आयोजित शेवटच्या शिबिरात त्या बोलत होत्या.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी नागरिकांना एकाच छताखाली सेवा पुरवल्या. महाराजस्व अभियान हा केवळ शिबिरापुरता मर्यादित उपक्रम नसून सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. शिबीरे संपल्यानंतरही दाखले वाटप व इतर सेवा नियमित सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर अनेक सेवा उपलब्ध आहेत. नागरिकांनी, विशेषतः तरुण पिढीने, ऑनलाईन अर्ज करून या सेवांचा लाभ घ्यावा. बहुतांश सेवासाठी योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास ठराविक कालमर्यादेत प्रमाणपत्र उपलब्ध करणे ही प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी आहे, असे जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या
No comments:
Post a Comment