नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या
विधान परिषद पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी होणार मतमोजणी
मुंबई, दि. 18 : चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधानपरिषद जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेचा कार्यकाळ 1 जानेवारी 2028 पर्यंत आहे.
या निवडणुकीची अधिसूचना सोमवार, 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, 1 जून 2026 असून, अर्जांची छाननी मंगळवार, 2 जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख गुरूवार, 4 जून 2026 आहे.
या पोटनिवडणुकीसाठी मतदान गुरूवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी सोमवार, 22 जून 2026 रोजी करण्यात येईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार, 25 जून 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे तसेच त्यातील 75 टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. या निकषांची पूर्तता न झाल्याने संबंधित पोटनिवडणूक आतापर्यंत घेता आली नव्हती. मात्र, आता हे निकष पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आयोगाला दिल्यानंतर आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment