छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून
नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती
- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा
· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम
मुंबई, दि. १० : नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविणे हा राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. हा अभिनव उपक्रम असून शासन, प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. लोकांच्या मनात शासन व प्रशासनाबद्दल विश्वास दृढ करण्यासाठी राज्य शासन स्वतः लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या या प्रयत्नांना नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानांतर्गत ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा क्र. २ येथे समाधान शिबिर उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले. यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार विजय चौधरी, सह आयुक्त (करमणूक कर) रवींद्र पवार, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन तापडिया आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment